नवी मुंबई : अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) नावाचा गैरवापर करून पानटपरी चालकांकडून पैसे उकळणाऱ्या टोळीचा एपीएमसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. FDA अधिकारी असल्याची बतावणी करत छापेमारी आणि गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन ही टोळी पानटपरी चालकांना लुटत होती. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून २ लाख ६६ हजार रुपयांची रोकड आणि एक टोयोटा इनोव्हा क्रिस्टा कार जप्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्वतःची ओळख FDA अधिकारी म्हणून करून देत विशेषतः गुटखा विक्री करणाऱ्या पानटपरी चालकांना लक्ष्य केले होते. संबंधित व्यावसायिकांची माहिती गोळा करून त्यांच्या दुकानांवर कारवाई करण्याची तसेच गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवली जात होती. या माध्यमातून आरोपी पैसे वसूल करत होते. त्यांच्याकडे फूड अँड ड्रग्स कन्झ्युमर वेल्फेअर कमिटीची बनावट ओळखपत्रेही आढळून आली आहेत.या टोळीच्या कारवर मनसेचा झेंडा लावण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे. त्यामुळे आरोपींच्या या प्रकाराची परिसरात चर्चा सुरू झाली आहे.
मारहाण करून ऑनलाइन ट्रान्सफरद्वारे उकळले पैसे
४ नोव्हेंबर रोजी कोपरी परिसरातील पानटपरी चालक अभिलाष पांडे यांना आरोपींनी लक्ष्य केले. FDA अधिकारी असल्याचे सांगत त्यांच्या घराची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने इनोव्हा कारमध्ये बसवून कोपरी आणि कोपरखैरणे परिसरात फिरवण्यात आले.
यावेळी आरोपींनी पांडे यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या मोबाईलमधून १ लाख ८६ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने ट्रान्सफर करून घेतले. याशिवाय त्यांच्या पत्नीकडून ८० हजार रुपये घेतले. अशा प्रकारे आरोपींनी एकूण २ लाख ६६ हजार रुपयांची लूट केली.
सहा आरोपी पोलिसांच्या ताब्यात
या घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलिसांनी तपास सुरू करून संबंधित टोळीचा पर्दाफाश केला. या प्रकरणात प्रशांत शिंदे, सत्येंद्र रस्तोगी, अथर्व भोसले, प्रथमेश गायकर, अंकुश पवार आणि उमेश कोडग या सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आरोपींकडून २ लाख ६६ हजार रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली टोयोटा इनोव्हा क्रिस्टा कार जप्त करण्यात आली आहे. FDA अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या या टोळीच्या प्रकारामुळे नवी मुंबईत खळबळ उडाली आहे.
