ठाणे : सायबर गुन्हेगारांनी थेट ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचेच व्हॉट्सॲप खाते हॅक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी (१७ नोव्हेंबर) सायंकाळी अचानक त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर एकापाठोपाठ एक अश्लील व्हिडीओ अपलोड करण्यात आल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली. अवघ्या काही मिनिटांत तब्बल २० आक्षेपार्ह व्हिडीओ स्टेटसवर झळकल्याने पोलीस यंत्रणेची धावपळ सुरू झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी ४ वाजून ४६ मिनिटांच्या सुमारास हा प्रकार सुरू झाला. सुरुवातीला आयुक्तांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर एक अश्लील व्हिडीओ दिसला. त्यानंतर काही वेळातच टप्प्याटप्प्याने आणखी व्हिडीओ अपलोड होऊ लागले. काही मिनिटांतच अशा व्हिडीओंची संख्या सुमारे २० वर पोहोचली. आयुक्तांच्या नावाने हे स्टेटस प्रसारित होत असल्याने अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही लक्ष या प्रकाराकडे गेले.
ही बाब लक्षात येताच संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पोलीस आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे अन्वेषण शाखा आणि सायबर गुन्हे अन्वेषण कक्षाला तातडीने सतर्क करण्यात आले. सायबर पथकाने व्हॉट्सॲप खात्याचा अनधिकृत ताबा कसा मिळवण्यात आला, याचा तांत्रिक तपास सुरू केला.
दरम्यान, स्टेटसवर आक्षेपार्ह व्हिडीओ अपलोड होण्याचे सत्र सुरूच असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. अखेर सायंकाळी सहाच्या सुमारास सर्व आक्षेपार्ह व्हिडीओ हटविण्यात यश आले. मात्र, व्हॉट्सॲप खाते पूर्ववत करण्यासाठी पोलिसांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
या घटनेनंतर ठाणे पोलीस दलाच्या जनसंपर्क विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोशन साळवी यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. पोलीस आयुक्तांचे व्हॉट्सॲप खाते हॅक झाल्याचे स्पष्ट करत संबंधित खात्याच्या स्टेटसवर दिसणाऱ्या कोणत्याही व्हिडीओवर विश्वास ठेवू नये, असे पोलिसांनी सांगितले आहे.
तसेच या व्हिडीओ डाउनलोड करणे, मोबाईलमध्ये साठवणे किंवा इतरांना पाठवणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. संबंधित व्हॉट्सॲप क्रमांकावरून कोणताही संशयास्पद संदेश किंवा लिंक आल्यास त्यावर क्लिक करू नये अथवा प्रतिसाद देऊ नये, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.या प्रकरणाबाबत कोणत्याही अफवा पसरवू नयेत. आक्षेपार्ह व्हिडीओ किंवा चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पोलीस यंत्रणेच्या सायबर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
सामान्य नागरिकांनाच नव्हे, तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही सायबर गुन्हेगार लक्ष्य करत असल्याचे या घटनेतून समोर आले आहे. थेट पोलीस आयुक्तांचे व्हॉट्सॲप खाते हॅक झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डिजिटल सुरक्षेबाबत आणि सायबर सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या हॅकिंगमागे नेमके कोण आहे आणि खाते कशा पद्धतीने हॅक करण्यात आले, याचा तपास सायबर यंत्रणेकडून सुरू आहे.
