पुणे महानगरपालिकेने फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर केलेल्या कारवाईचे स्वागत करतानाच, ही कारवाई केवळ एका रस्त्यापुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण पुणे शहरातील अतिक्रमणांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केली आहे. संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे फोफावली असून, आयुक्तांनी प्रत्यक्ष शहरात फिरून सर्वच ठिकाणी कारवाई करावी. विशेषतः सोलापूर रस्ता प्रचंड अतिक्रमणांनी व्यापला असून, तेथील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे.

पथारी व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा विचार करून त्यांना पुणे महानगरपालिकेच्या अखत्यारीतील उपलब्ध जागांवर स्थलांतरित करून त्यांचे योग्य पुनर्वसन करावे. मात्र, प्रशासनाने संपूर्ण पुणे शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी तातडीने कारवाई केली नाही, तर शिवसेनेच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या आवारातच मोठे आंदोलन उभारून तेथे भाजी मंडई भरविण्यात येईल, असा आक्रमक इशारा प्रमोद नाना भानगिरे यांनी दिला आहे.
