पुणे : पुण्यातील कॅम्प परिसरातील एमजी रोडवरील प्रसिद्ध खाऊ गल्लीमध्ये अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अचानक तपासणी मोहीम राबवली. या तपासणीत पाच खाद्यविक्री केंद्रांकडे व्यवसायासाठी आवश्यक असलेला अधिकृत परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र नसल्याचे समोर आले. त्यानंतर प्रशासनाने संबंधित पाच विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत. १६ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली असून, मोहिमेदरम्यान एकूण १५ आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
१५ दुकानांची तपासणी, पाच ठिकाणी नियमांचे उल्लंघन
FDA च्या पुणे विभागातील झोन क्रमांक ६ च्या विशेष पथकाने एमजी रोडवरील खाऊ गल्ली परिसरातील खाद्यविक्री केंद्रांची पाहणी केली. यावेळी पाच आस्थापनांकडे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा (FSSAI) परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र नसल्याचे आढळले.
कारवाई करण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये क्लासिक क्लब सँडविच, श्री कृष्ण छोले भटुरे, ए-वन सँडविच, लेट्स बार्बेक्यू आणि श्री कृष्ण चौपाटी या खाद्यविक्री केंद्रांचा समावेश आहे. ही सर्व दुकाने टॅबूट स्ट्रीट परिसरात आहेत. आवश्यक परवान्यांअभावी या पाचही विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत नोटिसा बजावल्या
अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ अंतर्गत संबंधित व्यावसायिकांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या. राज्य सरकारच्या 'सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र' या अभियानांतर्गत ही तपासणी मोहीम राबवण्यात आली.
या कारवाईचे नेतृत्व FDA चे सहआयुक्त श्रीकांत कारकळे आणि नियुक्त अधिकारी एन. आर. सरकाटे यांनी केले. अन्न सुरक्षा अधिकारी सतीश हाके, पूजा बागडे, दिपाली घोडके, प्रिया राजगोळकर आणि नम्रता मोहिते हेही तपासणी पथकात सहभागी होते.
मोठ्या हॉटेलांनंतर आता छोट्या खाद्यविक्रेत्यांवरही कारवाई
FDA कडून अलीकडे करण्यात येणाऱ्या तपासणी मोहिमांवरून प्रशासनाच्या कारवाईबाबत टीका झाली होती. प्रसिद्ध हॉटेल्स आणि रेस्टॉरंटवरच कारवाई केली जाते, मात्र रस्त्यावरील खाद्यविक्रेते आणि छोट्या व्यावसायिकांच्या तपासणीकडे दुर्लक्ष होते, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
आता एमजी रोडवरील खाऊ गल्लीतील पाच विक्रेत्यांवर झालेल्या कारवाईमुळे छोट्या खाद्यव्यावसायिकांनाही FDA च्या तपासणीला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून आले आहे. शहरातील अन्य भागांतील खाद्यविक्री केंद्रांचीही अशाच प्रकारे तपासणी होणार का, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकाने व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आवश्यक परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे, असे सहआयुक्त श्रीकांत कारकळे यांनी स्पष्ट केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. तसेच अशा तपासणी मोहिमा पुढेही सुरू राहतील, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
