पुणे : शिवसेना ठाकरे गटाने पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेविरोधात आंदोलन केले. शायना एन.सी. यांच्याकडून शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र फाडले गेल्याच्या घटनेचा निषेध करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी एकनाथ शिंदे आणि शायना एन.सी. यांचे पोस्टर फाडून त्यांचा निषेध करण्यात आला. फाडलेल्या पोस्टरचे मुठा नदीत विसर्जन करत कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे आणि शायना एन.सी. यांचे पोस्टर पायदळी तुडवले. त्यानंतर फाडलेल्या पोस्टरचे मुठा नदीत विसर्जन करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राचा अवमान झाल्याचा आरोप करत ठाकरे गटाने हे आंदोलन केले.
नेमका वाद कशामुळे निर्माण झाला?
मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्यांकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या नावाशी संबंधित 'बिलॉन्गिंग – अ जर्नी ऑफ लव्ह' या पुस्तकातील मजकुरावर आक्षेप घेत शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी निषेध व्यक्त केला. या पुस्तकातील काही मजकूर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारा असल्याचा आरोप करत पत्रकार परिषदेत पुस्तकाच्या प्रती आणि पाने फाडण्यात आली.
याचवेळी शायना एन.सी. यांच्याकडून पुस्तकासोबत असलेले बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्रही फाडले गेल्याचे समोर आले. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आणि ठाकरे गटाने यावर तीव्र आक्षेप घेतला.
शायना एन.सी. यांनी काय दिले स्पष्टीकरण?
या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना शायना एन.सी. यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र फाडण्याचा आपला हेतू नव्हता, असे स्पष्ट केले. आपण मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडला होता, असे त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे, तर मणिशंकर अय्यर यांचा फोटो दहा वेळा फाडू, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
एकनाथ शिंदेंनी शायना एन.सी. यांना बोलावले?
या संपूर्ण प्रकरणानंतर शायना एन.सी. विधानभवनात पोहोचल्याची माहिती समोर आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना चर्चेसाठी बोलावून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. पत्रकार परिषदेत घडलेल्या प्रकाराबाबत शिंदे त्यांच्याशी काय चर्चा करणार, याकडे लक्ष लागले आहे.दरम्यान, पुण्यात ठाकरे गटाने केलेल्या आंदोलनामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रावरून सुरू झालेला वाद पुन्हा चर्चेत आला आहे.
