गोंदिया : पतीचे दुसऱ्या महिलेसोबत असलेले संबंध सहन न झाल्याने पत्नीनेच त्या महिलेच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्षा तुरकर हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात गोंदिया पोलिसांना यश आले असून, या हत्येसाठी तब्बल १३ लाख रुपयांची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत सुमारे २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून या हत्याकांडाचा छडा लावला. या प्रकरणी मुख्य आरोपी महिलेसह चार जणांना अटक करण्यात आली असून, अन्य दोन आरोपी फरार आहेत.
जंगल परिसरात वर्षा यांची निर्घृण हत्या
पुण्यातील धानोरी येथे राहणाऱ्या ३४ वर्षीय वर्षा धुनातलाल तुरकर या दिवाळीच्या सुट्टीनिमित्त मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील खैरलांजी येथे माहेरी आल्या होत्या. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी त्या आपले मित्र नितेश अग्रवाल यांच्यासोबत तिरोडा येथे गेल्या होत्या. तेथून परतत असताना बोंडराणी येथील शिवमंदिराजवळील जंगल परिसरात तीन हल्लेखोरांनी त्यांचा रस्ता अडवला. त्यानंतर धारदार चाकूने पोटावर आणि पाठीवर वार करत त्यांची हत्या केली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.या प्रकरणी १५ नोव्हेंबर रोजी दवनीवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
२०० CCTV कॅमेऱ्यांच्या फुटेजमधून मिळाला महत्त्वाचा धागा
हत्येचे गांभीर्य लक्षात घेऊन गोंदिया पोलिसांनी तपासासाठी विशेष पथके तयार केली. वर्षा यांच्या प्रवासाच्या मार्गावरील तिरोडा, खैरलांजी, वाराशिवनी, बालाघाट आणि गोंदिया परिसरातील सुमारे २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. सलग चार दिवसांच्या तपासात संशयित आरोपी मोटारसायकलवरून नितेश अग्रवाल यांच्या कारचा पाठलाग करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गोंदिया येथून इमरान करीम शेख याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता या हत्येमागील कटाचा उलगडा झाला.
पतीच्या मैत्रिणीचा काटा काढण्यासाठी १३ लाखांची सुपारी
पोलीस तपासानुसार, नितेश अग्रवाल आणि वर्षा तुरकर यांच्यातील जवळीक नितेशची पत्नी मोना अग्रवाल हिला मान्य नव्हती. याच कारणातून तिने वर्षा यांना संपवण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप आहे. या कटासाठी तिने कुणाल कुंभळकर याची मदत घेतली आणि त्याच्या माध्यमातून शाहरुख खान पठाण याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर वर्षा यांच्या हत्येसाठी १३ लाख रुपयांची सुपारी दिल्याचे तपासात समोर आले आहे.
मुख्य आरोपी पत्नीसह चौघांना अटक, दोघांचा शोध सुरू
या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी मोना नितेश अग्रवाल (वय ४१), इमरान करीम शेख (वय २६), शाहरुख खान फिरोज खान पठाण आणि कुणाल श्यामलाल कुंभळकर या चौघांना अटक केली आहे. तर नलिन ऊर्फ नायलान शेख आणि क्रिशा राऊत हे दोन आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
२०० सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि आरोपींच्या चौकशीतून वर्षा तुरकर हत्या प्रकरणातील कथित कट उघड झाला आहे. या घटनेमुळे गोंदिया जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, फरार आरोपींचा शोध आणि पुढील तपास पोलीस करत आहेत.
