सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सरकारचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्त भागातील अनावश्यक कामांना ब्रेक, टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी पुरवठ्यावर भर देण्याचे आदेश
  • पंढरपुरात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड; २५ मिनिटं प्रतीक्षा, अखेर प्रवासाचा प्लॅन बदलला!
  • मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
  • मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
  • अखेर शायना एनसींनी माफी मागितली, भलीमोठी पोस्ट करत म्हणाल्या, 'माझ्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास'
 क्राईम

13 लाखांची सुपारी देऊन पतीच्या मैत्रिणीची हत्या; पत्नीनेच रचला मृत्यूचा कट, पुण्यातील एअर होस्टेस प्रकरणाचा धक्कादायक उलगडा, अडीच वर्षांची मुलगी झाली पोरकी

डिजिटल पुणे    20-11-2026 17:24:56

गोंदिया : पतीचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून पत्नीनेच तिच्या हत्येचा कट रचल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील एअर होस्टेस वर्षा तुरकर यांच्या हत्या प्रकरणाचा गोंदिया पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या हत्येसाठी तब्बल 13 लाख रुपयांची सुपारी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी मोना अग्रवालसह चार जणांना अटक करण्यात आली असून, आणखी दोन आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे वर्षा यांची अवघ्या अडीच वर्षांची मुलगी आईच्या मायेपासून कायमची वंचित झाली आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी वर्षा यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

पुण्यातील धानोरी परिसरात वास्तव्यास असलेल्या वर्षा तुरकर या दिवाळीच्या सुट्टीनिमित्त मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील खैरलांजी येथे माहेरी आल्या होत्या. 14 नोव्हेंबर 2026 रोजी त्यांचा मित्र नितेश ऊर्फ नितीन अग्रवाल हा चारचाकी वाहन घेऊन त्यांना भेटण्यासाठी आला होता. त्यानंतर दोघेही तिरोडा येथे फिरण्यासाठी गेले. परतीच्या प्रवासात गोंदिया जिल्ह्यातील बोंडराणी परिसरातील शिवमंदिराजवळील जंगलात त्यांनी गाडी थांबवली. याच वेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी वर्षा यांच्यावर चाकूने वार करत त्यांची हत्या केली.

या घटनेनंतर गोंदिया पोलिसांनी तपासासाठी सहा विशेष पथके तयार केली. घटनास्थळापासून तिरोडा, खैरलांजी, वाराशिवनी, बालाघाट आणि गोंदिया परिसरातील तब्बल 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. यामध्ये तीन तरुण दुचाकीवरून नितेशच्या कारचा पाठलाग करत असल्याचे दिसून आले. दुसरीकडे, वर्षा यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने सुरक्षित असल्याने ही घटना लुटमारीच्या उद्देशाने घडल्याची शक्यता पोलिसांनी फेटाळून लावली.

प्रेमसंबंधांच्या संशयातून हत्येचा कट

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नितेश अग्रवाल आणि वर्षा तुरकर यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा संशय नितेशची पत्नी मोना अग्रवाल (वय 41) हिला होता. याच कारणामुळे मोना नाराज होती. अखेर वर्षा यांना संपवण्यासाठी तिने कट रचल्याचा आरोप आहे. या कामासाठी तिने कुणाल श्यामलाल कुंभलकर (वय 31) याची मदत घेतली. कुणालने शाहरुख खान फिरोज खान पठाण (वय 33) याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर वर्षा यांच्या हत्येसाठी 13 लाख रुपयांची सुपारी निश्चित करण्यात आली.

या प्रकरणातील तपासादरम्यान पोलिसांनी 19 नोव्हेंबर रोजी गोंदियातील मुर्री परिसरातून इमरान करीम शेख (वय 26) याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यानंतर या हत्येमागील कटाची माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणात मोना अग्रवालसह चार जणांना अटक करण्यात आली असून, इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

जीपीएस लोकेशनच्या आधारे आरोपींनी साधला निशाणा

या संपूर्ण हत्याकांडात कारमधील जीपीएस यंत्रणेचा वापर करण्यात आल्याची बाबही समोर आली आहे. नितेश वर्षा यांच्यासोबत ज्या कारमधून प्रवास करत होता, ती कार मोना अग्रवाल हिच्या नावावर होती. या वाहनात टोयोटा आय-कनेक्ट ही लोकेशन ट्रॅकिंग सुविधा उपलब्ध होती. मोनाने या सुविधेचा आयडी आणि पासवर्ड हल्लेखोरांना दिल्याने त्यांना मोबाईलवरून कारचे लाईव्ह लोकेशन पाहता येत होते.

नितेशची कार बोंडराणी येथील निर्जन जंगल परिसरात थांबल्याचे समजताच हल्लेखोर दुचाकीवरून तेथे पोहोचले. त्यांनी वर्षा यांच्यावर चाकूने सपासप वार केले. त्यांच्या पोटावर आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वर्षा यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अशा प्रकारे जीपीएस तंत्रज्ञानाच्या मदतीने कारचा मागोवा घेत नियोजनबद्ध पद्धतीने हत्येचा कट रचल्याचा आरोप तपासात समोर आला आहे.

अडीच वर्षांच्या चिमुकलीच्या डोक्यावरील आईचे छत्र हरपले

वर्षा तुरकर यांच्या हत्येने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या अवघ्या अडीच वर्षांच्या मुलीला आता आईच्या मायेविना आयुष्य जगावे लागणार आहे. ज्या वयात मुलांना आईच्या कुशीत सुरक्षितता आणि प्रेम मिळण्याची गरज असते, त्याच वयात या चिमुकलीच्या डोक्यावरील आईचे छत्र हरपले आहे.

या घटनेमुळे वर्षा यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून, आपल्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपींना कोणतीही दया दाखवू नये, अशी त्यांची मागणी आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी आर्त विनंती वर्षा यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.


 Give Feedback



 जाहिराती