सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सरकारचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्त भागातील अनावश्यक कामांना ब्रेक, टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी पुरवठ्यावर भर देण्याचे आदेश
  • पंढरपुरात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड; २५ मिनिटं प्रतीक्षा, अखेर प्रवासाचा प्लॅन बदलला!
  • मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
  • मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
  • अखेर शायना एनसींनी माफी मागितली, भलीमोठी पोस्ट करत म्हणाल्या, 'माझ्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास'
 राज्य

सात आठवड्यांच्या 'राजा'साठी अनंत अंबानींचा पुढाकार! आसाममधून गुजरातमध्ये एअरलिफ्ट, मृत्यूशी झुंज देणाऱ्या हत्तीच्या पिल्लाला मिळणार नवे आयुष्य

डिजिटल पुणे    20-11-2026 17:45:09

गुवाहाटी : जन्मापासूनच गंभीर दुखापतीचा सामना करणाऱ्या अवघ्या सात आठवड्यांच्या 'राजा' या हत्तीच्या पिल्लाला वाचवण्यासाठी विशेष बचाव मोहीम राबवण्यात आली आहे. आसाममधील गुवाहाटी येथून गुजरातमधील जामनगर येथील वनतारा प्राणी रुग्णालयात त्याला विमानाने हलवण्यात आले आहे. अनंत अंबानी यांच्या पुढाकारातून ही विशेष एअरलिफ्ट मोहीम यशस्वीपणे पार पडली.

राजाची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने त्याला रस्तेमार्गे नेणे धोकादायक ठरले असते. आसाम ते गुजरात हे 2,500 किलोमीटरहून अधिक अंतर पार करण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली. अनंत अंबानी यांच्या सहकार्याने भारतात राबवण्यात आलेली अशा स्वरूपाची ही तिसरी मोठी बचाव मोहीम असल्याचे सांगण्यात येत आहे.

वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनान करानी यांनी राजाच्या प्रकृतीबाबत भावना व्यक्त केल्या. जन्मापासूनच पायाला गंभीर दुखापत असूनही या छोट्या हत्तीने हार मानलेली नाही. गेल्या सात आठवड्यांपासून तो प्रतिकूल परिस्थितीशी धैर्याने लढत आहे. आता त्याला पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी वनताराची वैद्यकीय टीम प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आईच्या लाथेमुळे मांडीचे हाड मोडले

'राजा'चा जन्म 2 ऑक्टोबर रोजी आसाममधील गोगामुख येथे झाला. जन्मानंतर काही वेळातच त्याच्या 11 वर्षांच्या आईची चुकून लाथ लागली. यामध्ये त्याच्या उजव्या मागील पायाचे मांडीचे हाड पूर्णपणे फ्रॅक्चर झाले. त्यामुळे त्याला स्वतःच्या पायावर उभे राहणे आणि चालणेही शक्य नव्हते. त्यातच नवजात पिल्लांना रोगप्रतिकारक शक्ती मिळण्यासाठी आवश्यक असलेले आईचे पहिले दूधही त्याला मिळू शकले नाही.

सात आठवड्यांपासून सुरू होते उपचार

राजाच्या मदतीसाठी वनताराच्या रॅपिड रिस्पॉन्स टीमने 8 ऑक्टोबर रोजी घटनास्थळी धाव घेतली होती. तपासणी आणि एक्स-रेमध्ये त्याच्या पायाचे हाड जागेवरून सरकल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर प्लास्टर, विशेष पट्ट्या आणि स्लिंगच्या साहाय्याने त्याच्या पायाला आधार देण्यात आला. तसेच त्याच्या प्रकृतीनुसार विशेष पोषणयुक्त दूध देण्यास सुरुवात करण्यात आली.10 ऑक्टोबर रोजी त्याला पोहुमारा येथील मालकाच्या घरी हलवण्यात आले. पायावर शरीराचे वजन न पडता हालचाल करता यावी, यासाठी तेथे विशेष हायड्रोथेरपी तलावही तयार करण्यात आला होता.

मात्र, अलीकडेच त्याला जुलाबाचा त्रास सुरू झाला. वैद्यकीय तपासणीत 'क्लेबसिएला न्यूमोनिया' या जिवाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय रक्तातील साखरेची पातळी कमी होणे, यकृताशी संबंधित वाढलेले निर्देशांक, सतत एकाच स्थितीत पडून राहिल्याने डोक्यावर जखमा आणि हर्नियाचा त्रास अशा अनेक समस्यांनी त्याची प्रकृती अधिक गंभीर झाली.

चार तासांचा विमान प्रवास, डॉक्टरांची विशेष टीम सोबत

राजाला सुरक्षितपणे जामनगरला पोहोचवण्यासाठी विशेष मऊ गादी असलेला क्रेट तयार करण्यात आला होता. त्यामध्ये त्याच्या जखमी पायाला योग्य आधार देण्यासह शरीरावरील जखमांचे संरक्षण करण्याची व्यवस्था करण्यात आली. चार तासांच्या विमान प्रवासात पशुवैद्यकीय डॉक्टर, पॅरावेट्स आणि काळजीवाहकांची टीम त्याच्यासोबत होती. प्रवासादरम्यान त्याच्या शरीरातील ऑक्सिजन, पाण्याची पातळी आणि रक्तातील साखरेवर सातत्याने लक्ष ठेवण्यात आले.

वनतारामध्ये अत्याधुनिक उपचार सुरू होणार

जामनगर येथील वनतारा हत्ती रुग्णालयात दाखल झाल्यानंतर आता राजावर विशेष वैद्यकीय उपचार केले जाणार आहेत. यामध्ये प्रगत निदान चाचण्या, ऑर्थोपेडिक उपचार, वेदना कमी करण्यासाठी उपचार, हालचालींसाठी विशेष थेरपी आणि दीर्घकालीन पुनर्वसनाचा समावेश असेल.

मृत्यूशी झुंज देणाऱ्या या चिमुकल्या हत्तीला पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी वनतारातील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम प्रयत्नशील आहे. 'राजा' पुन्हा चालू शकेल आणि एक दिवस धावूही शकेल, अशी आशा या बचाव मोहिमेमुळे निर्माण झाली आहे.


 Give Feedback



 जाहिराती