भाईंदर : मैत्रीच्या नात्याचा गैरफायदा घेत एका अल्पवयीन मुलीला अत्याचाराच्या जाळ्यात ओढल्याची धक्कादायक घटना भाईंदरमध्ये उघडकीस आली आहे. २५ वर्षीय मैत्रिणीने भेटण्याच्या बहाण्याने १७ वर्षीय मुलीला बोलावले. त्यानंतर तिला जबरदस्तीने मद्य पाजून तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर पीडिता बेशुद्धावस्थेत असताना तिच्या गळ्यातील सोन्याची चैनही चोरीला गेली. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना भाईंदरमधील काशीगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. १६ नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास पीडित मुलीच्या २५ वर्षीय मैत्रिणीने तिला भेटण्याच्या निमित्ताने बोलावले होते. मैत्रिणीवर विश्वास ठेवून पीडिता तिला भेटण्यासाठी गेली. मात्र, यानंतर तिच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला.
नेमकी घटना काय?
पीडित मुलगी मैत्रिणीला भेटण्यासाठी गेल्यानंतर रात्री ९ ते १२ वाजण्याच्या दरम्यान तिला विनयनगर परिसरातील एका उच्चभ्रू इमारतीमधील फ्लॅटवर नेण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. तेथे मैत्रिणीसह तीन तरुण उपस्थित होते. पीडितेला जबरदस्तीने मद्य पाजण्यात आले. त्यानंतर दोन तरुणांनी तिच्यावर पहाटे सहा वाजेपर्यंत आळीपाळीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.या अमानुष प्रकारानंतर पीडिता बेशुद्धावस्थेत गेली. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत तिच्या गळ्यातील सोन्याची चैनही काढून घेण्यात आल्याचे समोर आले आहे.
काशीगाव पोलिसांकडून तपास सुरू
या घटनेनंतर पीडितेने काशीगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. अल्पवयीन मुलीला विश्वासात घेऊन तिच्यासोबत घडवण्यात आलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.