सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : महाराष्ट्रात थंडी जोर धरणार; पुढच्या ५ दिवसांचा हवामान अंदाज आला समोर, अक्वान चक्रीवादळाचा परिणाम नाही
  • टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
  • सरकार आणि शिवसेना शेतकऱ्यांसोबत, कोणतंही वेडंवाकडं पाऊल उचलू नका; एकनाथ शिंदेंचं पंढरपुरातून आवाहन
 शहर

पुण्यातील नामांकित महाविद्यालयाचा धक्कादायक प्रकार! विद्यार्थिनी १४ तास लिफ्टमध्ये अडकली, सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

डिजिटल पुणे    21-11-2026 17:32:47

पुणे : पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी घटना समोर आली आहे. महाविद्यालयात शिक्षण घेणारी १९ वर्षीय विद्यार्थिनी तब्बल १४ तास लिफ्टमध्ये अडकून पडली. बुधवारी दुपारी वर्ग संपल्यानंतर लिफ्टमधून जात असताना अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने पाचव्या आणि सहाव्या मजल्याच्या दरम्यान लिफ्ट बंद पडली. यामुळे विद्यार्थिनी आतच अडकली.

लिफ्टमध्ये अडकल्यानंतर विद्यार्थिनीने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तिने दरवाजावर ठोठावून आणि आरडाओरड करून मदतीसाठी हाक दिली. मात्र, तिचा आवाज बाहेरपर्यंत पोहोचला नाही. मोबाईलला नेटवर्क नसल्याने तिला कोणाशीही संपर्क साधता आला नाही. परिणामी, अन्न-पाण्याविना तिला रात्रभर लिफ्टमध्येच राहावे लागले.

दरम्यान, मुलीशी संपर्क होत नसल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. त्यांनी लोणी काळभोर पोलिसांशी संपर्क साधून तिचा शोध सुरू केला. परिसरात शोधाशोध आणि नातेवाईकांकडे चौकशी करूनही तिचा पत्ता लागला नाही. अखेर मध्यरात्री पोलिसांकडे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर महाविद्यालयाचे कर्मचारी, पोलीस आणि कुटुंबीयांनी रात्रभर शोधमोहीम राबवली. विशेष म्हणजे, ज्या परिसरात शोध सुरू होता, त्याच ठिकाणच्या लिफ्टमध्ये विद्यार्थिनी अडकली असल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही.

गुरुवारी सकाळी इमारतीची लिफ्ट पुन्हा सुरू झाल्यानंतर तब्बल १४ तासांनी विद्यार्थिनीची सुटका झाली. या काळात ती प्रचंड घाबरली होती. या घटनेने महाविद्यालयातील लिफ्टची देखभाल, सुरक्षा व्यवस्था आणि आपत्कालीन मदत यंत्रणेतील त्रुटी समोर आणल्या आहेत.

महाविद्यालयाकडून चौकशी समिती स्थापन

घटनेची माहिती मिळताच महाविद्यालय प्रशासनाने याची गंभीर दखल घेत चौकशी समिती स्थापन केली आहे. संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी संबंधित परिसरातील वीजपुरवठा पाच ते सहा वेळा खंडित झाला होता. या संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक तपासणी केली जाणार असून, कोणाचीही चूक आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मात्र, तब्बल १४ तास विद्यार्थिनी लिफ्टमध्ये अडकून असतानाही सुरक्षा यंत्रणेला याची माहिती कशी मिळाली नाही, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.


 Give Feedback



 जाहिराती