पुणे : पुणे शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेकडून जोरदार मोहीम राबवली जात असतानाच सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात या मोहिमेचे वेगळेच चित्र पाहायला मिळाले. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शनिवारी सकाळी खाऊगल्लीत कारवाई करत फ्रंट मार्जिनमधील अतिक्रमणे हटवली. मात्र, कारवाईनंतर अवघ्या दोन ते तीन तासांतच हॉटेल व्यावसायिकांनी पुन्हा टेबल-खुर्च्या मांडून व्यवसाय सुरू केला. त्यामुळे महापालिकेच्या कारवाईचा नेमका उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
माणिकबाग येथील खाऊगल्लीत अनेक खाद्यपदार्थांची दुकाने असून, दुकानांसमोरील मोकळ्या जागेत पत्र्याचे शेड आणि ताडपत्री उभारून व्यावसायिकांनी जागा व्यापली होती. त्यामुळे वाहनांच्या पार्किंगसाठी असलेल्या जागेचा वापर व्यवसायासाठी केला जात होता. या अतिक्रमणांमुळे परिसरातील वाहतुकीवरही परिणाम होत होता.
महापालिकेने शहरात सलग पाचव्या दिवशी अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू ठेवली. सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाने माणिकबागसह वडगाव आणि धायरी फाटा परिसरातही कारवाई केली. सकाळी माणिकबागेतील खाऊगल्लीत अतिक्रमणे हटवून जागा मोकळी करण्यात आली. मात्र, दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास याच जागेवर पुन्हा टेबल-खुर्च्या लावून हॉटेल सुरू करण्यात आल्याचे समोर आले.
अतिक्रमण हटविण्यामागचा उद्देशच अपूर्ण
फ्रंट मार्जिन आणि साइड मार्जिनमधील अतिक्रमणे हटवून संबंधित जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून देणे, रस्त्यावरील वाहनांचे पार्किंग कमी करणे आणि वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवणे, हा महापालिकेच्या मोहिमेमागील उद्देश आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनीही याबाबत भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, कारवाई झाल्यानंतर पुन्हा त्याच जागेवर व्यवसाय सुरू होत असल्याने अतिक्रमणांवर कायमस्वरूपी नियंत्रण ठेवण्यात महापालिकेला यश येत नसल्याचे दिसत आहे.
पुन्हा अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
दरम्यान, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांविरोधात घेतलेल्या ठाम भूमिकेचे क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी स्वागत केले आहे. सुजाण पुणेकर या मोहिमेत आयुक्तांच्या पाठीशी उभे राहतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
मात्र, फ्रंट मार्जिन आणि साइड मार्जिनमधील शेड हटविल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी शेड उभारून व्यवसाय सुरू केला जात असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. अशा प्रकारे पुन्हा अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम (MRTP Act), 1966 मधील तरतुदींनुसार गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी संदीप खर्डेकर यांनी केली आहे.
एकीकडे महापालिकेकडून अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू आहे, तर दुसरीकडे कारवाईनंतर काही तासांतच पुन्हा व्यवसाय सुरू होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याबरोबरच पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठी महापालिका प्रशासन काय उपाययोजना करणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.