मुंबई : महाराष्ट्रात आज, सोमवारी (२३ नोव्हेंबर) रिक्षाचालकांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूरसह राज्यातील विविध शहरांमध्ये या आंदोलनाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी विविध रिक्षा संघटनांच्या सहकार्याने या संपाची घोषणा केली आहे. त्यामुळे कामावर जाणारे नोकरदार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा वापर करावा लागू शकतो.
रॅपिडो बाईक टॅक्सी सेवेला विरोध
रॅपिडोच्या माध्यमातून सुरू असलेल्या बाईक टॅक्सी सेवेमुळे पारंपरिक रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचा आरोप रिक्षा संघटनांनी केला आहे. अनेक ठिकाणी बाईक टॅक्सी सेवा आवश्यक परवानग्या आणि नियमांचे पालन न करता सुरू असल्याचा दावा संघटनांकडून करण्यात येत आहे. वाहनांची नोंदणी, चालकांचा बॅज, आवश्यक कागदपत्रे आणि प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भातील नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचा आक्षेपही घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि विविध रिक्षा संघटनांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी संजय नाईक यांनी बाईक टॅक्सी सेवेमुळे रिक्षाचालकांच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचे सांगितले. पूर्वीच्या तुलनेत व्यवसाय ७५ ते ८० टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा त्यांनी केला. त्यातच पेट्रोल, एलपीजी आणि सीएनजीच्या वाढत्या दरांमुळे रिक्षाचालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पुण्यात सकाळी १० नंतर रिक्षा बंद आंदोलन
या राज्यव्यापी आंदोलनाला पुण्यातील विविध रिक्षा संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. मात्र शाळकरी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी सकाळच्या वेळेत रिक्षा सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सकाळी १० वाजल्यानंतर रिक्षाचालक आंदोलनात सहभागी होणार असल्याचे संघटनांकडून सांगण्यात आले.
'आम्हाला रिक्षासाठी पुरेशी भाडी मिळत नाहीत, तर खासगी कंपन्यांना या सेवेतून मोठा फायदा होत आहे,' अशी नाराजी रिक्षाचालकांनी व्यक्त केली आहे. पुण्यातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या कार्यालयासमोर, तर पिंपरी-चिंचवडमध्ये विधान परिषद उपसभापती अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
रिक्षा संघटनांच्या प्रमुख मागण्या काय?
प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी लागू असलेल्या नियमांची बाईक टॅक्सी सेवेलाही समान अंमलबजावणी करावी, अशी रिक्षा संघटनांची मागणी आहे. प्रवासी वाहतुकीसाठी चालकाकडे आवश्यक बॅज असणे आणि वाहनाला नियमानुसार पिवळी नंबर प्लेट असणे गरजेचे असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. मात्र बाईक टॅक्सी सेवेत या नियमांचे पालन होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय राज्यातील अनधिकृत प्रवासी वाहतूक बंद करावी, बाईक टॅक्सी सेवेसाठी लागू असलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि पारंपरिक रिक्षा-टॅक्सी चालकांना समान संधी मिळावी, अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत.
सरकारच्या धोरणांविरोधात आंदोलन
कोल्हापुरातील रिक्षाचालकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सरकारच्या धोरणांमुळे रिक्षा व्यवसाय अडचणीत येत असल्याचा आरोप करत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवाशांनी आंदोलनाला सहकार्य करावे, असे आवाहनही रिक्षा संघटनांकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यातील विविध शहरांमध्ये रिक्षा संघटनांनी संपात सहभाग जाहीर केला असला, तरी प्रत्यक्षात किती रिक्षा रस्त्यावरून बंद राहतात, हे स्थानिक पातळीवरील निर्णयांवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे आज प्रवासाचे नियोजन करणाऱ्या नागरिकांनी उपलब्ध पर्यायी वाहतुकीची माहिती घेऊनच घराबाहेर पडणे आवश्यक आहे.