पुणे : राज्य शासनाने बाईक टॅक्सी सेवेला परवानगी देण्याच्या घेतलेल्या भूमिकेविरोधात पुण्यातील रिक्षाचालक आक्रमक झाले आहेत. बाईक टॅक्सी सेवा कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी सोमवारी (२३ नोव्हेंबर) पुणे रिक्षा पंचायत आणि विविध रिक्षाचालक संघटनांनी परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या बिबवेवाडी येथील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. या आंदोलनामुळे शहरातील रिक्षा सेवा विस्कळीत झाली असून, सकाळपासून रिक्षा उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये रिक्षा पंचायत, आझाद रिक्षा संघटना आणि छावा वाहन चालक कामगार संघ या संघटनांचे पदाधिकारी व रिक्षाचालक सहभागी झाले होते. बाईक टॅक्सीमुळे रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होणार असून, त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
दरम्यान, दुपारी साडेअकरानंतर नव्हे, तर दीडच्या सुमारास परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आंदोलकांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. बाईक टॅक्सीच्या प्रश्नावर अभ्यास करून तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच रमानाथ झा समितीच्या अहवालाचा अभ्यास करून आगामी हिवाळी अधिवेशनात या विषयावर चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर कार्यालयासमोरील निदर्शने थांबवण्यात आली. मात्र, आश्वासनानंतरही रिक्षाचालकांनी सेवा सुरू करण्यास नकार दिल्याने प्रवाशांची गैरसोय कायम राहिली.
रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष नितीन पवार यांनी सांगितले की, ऑटो रिक्षा चालवण्यासाठी विमा, योग्यता प्रमाणपत्र, निश्चित भाडेदर, वाहनाचा रंग आणि गणवेश अशा विविध नियमांचे पालन करावे लागते. मात्र, खासगी दुचाकींवरून प्रवासी वाहतूक करणाऱ्या बाईक टॅक्सी सेवेला अशाच प्रकारच्या जबाबदाऱ्या लागू नसतील, तर रिक्षाचालकांसाठी ती अन्यायकारक स्पर्धा ठरेल. आधीच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या रिक्षाचालकांच्या उत्पन्नावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
बाईक टॅक्सीच्या मुद्द्यावर रिक्षा संघटनांनी यापूर्वी २०२२ मध्ये पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आंदोलन केले होते. त्यानंतर पुणे-पिंपरी चिंचवड रिक्षा पंचायतीने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयांनी बाईक टॅक्सीला परवानगी नाकारत या संदर्भात धोरण तयार करण्याची जबाबदारी शासनावर सोपवली होती.
यानंतर शासनाने माजी सनदी अधिकारी रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन केली. या समितीसमोरही रिक्षा पंचायतीने आपली भूमिका मांडली होती. महानगरांमध्ये बाईक टॅक्सीला परवानगी देऊ नये, तर केवळ दुर्गम भागांमध्येच अशा सेवेला परवानगी द्यावी, अशी शिफारस झा समितीने केल्याचा दावा नितीन पवार यांनी केला.
बाईक टॅक्सीला कायमची बंदी घालण्याची मागणी
पुण्यात आधीच वाहतुकीच्या अनेक समस्या आहेत. अशा परिस्थितीत बाईक टॅक्सीला परवानगी दिल्यास वाहतुकीचा प्रश्न आणखी गंभीर होईल, असा दावा रिक्षा संघटनांनी केला आहे. बाईक टॅक्सीमुळे रिक्षाचालकांच्या उत्पन्नात घट होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे बाईक टॅक्सी सेवा कायमस्वरूपी हद्दपार करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. आता शासन या प्रश्नावर काय निर्णय घेते, याकडे पुण्यातील रिक्षाचालकांचे लक्ष लागले आहे.