लातूर : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील किनगाव पोलीस ठाण्यात एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमित रमेश चव्हाण असे मृत तरुणाचे नाव असून, तो मरशिवणी येथील रहिवासी होता. विशेष म्हणजे, पोलिसांनी त्याला एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या प्रकरणात एक दिवसापूर्वीच अटक केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पहाटे पोलीस ठाण्यातील खोलीत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून, पोलीस ठाण्याच्या आवारातच तरुणाचा मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. घटनेची माहिती मिळताच मृताच्या नातेवाईकांनी किनगाव पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली. अमितने आत्महत्या केली नसून, त्याच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. यावेळी संतप्त नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देत घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लातूरचे पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस ठाण्याच्या आवारात ही घटना घडल्याने तपासाची जबाबदारी सीआयडीकडे सोपवण्यात आली आहे. तसेच, लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेहाचे इन-कॅमेरा शवविच्छेदन करण्यात येत आहे.
पोलीस कोठडीत असलेल्या तरुणाचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याचा तपास आता सीआयडीकडून केला जाणार आहे. नातेवाईकांनी केलेल्या घातपाताच्या आरोपांमुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले असून, तपासातून नेमके काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.