सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ऑफिसच्या कॉम्प्युटरवर WhatsApp Web वापरताय? सावधान! एक निष्काळजीपणा पडू शकतो महागात; खासगी चॅट, संपर्क यादी धोक्यात, केंद्र सरकारचा इशारा
  • राज्यात आज रिक्षांचा संप; मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक शहरांतील प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता
  • मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
 शहर

पुणे ग्रँड टूर २०२७ च्या तयारीला वेग द्या; रस्ते, वाहतूक, सुरक्षा व वैद्यकीय सुविधांचे नियोजन गतीने पूर्ण करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

डिजिटल पुणे    23-11-2026 19:12:10

पुणे : पुणे ग्रँड टूर २०२७ ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा अधिक भव्य आणि यशस्वी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. स्पर्धेच्या मार्गावरील रस्ते, वाहतूक व्यवस्थापन, रस्ते सुरक्षा, वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षाव्यवस्थेची तयारी वेळेत पूर्ण करावी. जिल्ह्यातील अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) ठिकाणांवर संबंधित यंत्रणांनी आवश्यक सुधारात्मक उपाययोजना गतीने पूर्ण कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज दिले.

पुणे ग्रँड टूर २०२७ च्या नियोजनाबाबत शासकीय विश्रामगृह येथे आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला आमदार सुनील शेळके, आमदार चेतन तुपे, आमदार शंकर मांडेकर, आमदार बाबाजी काळे, आमदार हेमंत रासने, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले,  शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, यांच्यासह पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, पुणे ग्रँड टूर ही सायकल स्पर्धा स्वर्गीय अजित पवार यांच्या पुढाकाराने गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यात सुरू झाली. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि पुणेकरांनी दिलेल्या सहकार्यामुळे अल्पावधीतच या स्पर्धेला जागतिक स्तरावर ओळख मिळाली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे २०३२ मध्ये जागतिक सायकल फेडरेशनची चॅम्पियनशिप पुण्यात आयोजित करण्यास मान्यता मिळाली असून, हे सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे यश आहे.

२०२७ मधील स्पर्धेची व्याप्ती वाढली असून, यंदा २५ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी अधिक अर्ज प्राप्त झाले असून  मार्ग निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत आयोजनाची जबाबदारी अधिक वाढली आहे. सर्व विभागांनी मागील वर्षीप्रमाणे समन्वय आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे.

स्पर्धेच्या मार्गावरील रस्त्यांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. रस्त्यांची गुणवत्ता आणि दर्जा राखण्यासह एकापेक्षा अधिक यंत्रणा काम करत असलेल्या ठिकाणी विशेष दक्षता घ्यावी. लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या रस्त्यांच्या कामांबाबतच्या सूचनांची दखल घेऊन संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही करावी.

स्पर्धेच्या काळात शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येणार असल्याने पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांनी विशेष नियोजन करावे. वाहतुकीतील बदल, मार्ग बंद राहण्याची ठिकाणे आणि पर्यायी मार्ग यांची माहिती पुणेकरांना आगाऊ व व्यापक स्वरूपात उपलब्ध करून द्यावी. जिल्ह्यात वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेबाबतही आतापासूनच पूर्वतयारी करावी.

रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यातील अपघातप्रवण ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) गंभीर असून, संबंधित रस्ते यंत्रणांनी या ठिकाणी आवश्यक सुधारात्मक उपाययोजना गतीने पूर्ण कराव्यात. या कामांचा पुन्हा आढावा घेण्यात येईल.

पुण्याला जागतिक ओळख मिळवून देणारी पुणे ग्रँड टूर २०२७ ही स्पर्धा मागील वर्षापेक्षा अधिक भव्य आणि यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी दिलेल्या सूचनांनुसार वेळेत तयारी पूर्ण करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे ग्रँड टूरसाठी २६ व ३१ जानेवारीच्या सुट्टीच्या दिवशी सुमारे ३७० किमी मार्ग निश्चित केल्याने वाहतुकीचा त्रास कमी होणार असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यातील २२ ब्लॅक स्पॉट्सवर रस्ते सुरक्षा उपाय, सायनेज, दिवे, सीसीटीव्ही व वेग नियंत्रणाची कामे ६० दिवसांत पूर्ण करावीत, अशी सूचना केली. सुरक्षा उपायांना प्राधान्य द्यावे,असे त्यांनी नमूद केले.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुणे ग्रँड टूर २०२७ बाबत माहिती दिली. रस्ते विकासासाठी विविध यंत्रणांमार्फत निधी उपलब्ध करून दिला असून, जागतिक स्तरावरील सुमारे ९० संघांच्या अर्जांतून २५ संघांची निवड करण्यात येणार आहे. २०३२ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर यंदाचे आयोजन अधिक सक्षमपणे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे ग्रँड टूरच्या आयोजनासंदर्भात आमदार सुनील शेळके, चेतन तुपे, शंकर मांडेकर, बाबाजी काळे आणि हेमंत रासने यांनी रस्त्यांची कामे, वाहतूक नियोजन व अन्य सुविधांबाबत विविध सूचना आणि मुद्दे मांडले. त्यावर बैठकीत सविस्तर चर्चा करून संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पुणे ग्रँड टूरच्या आयोजनासाठी विविध विभागांकडून करण्यात आलेल्या तयारीची माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीला स्पर्धेच्या नियोजनाशी संबंधित विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती