सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज्यात पुन्हा 'ऑपरेशन टायगर'च्या हालचाली, ठाकरे गटाचा नेता मुंबईतील शिंदे सेनेच्या बैठकीला, चर्चांना उधाण
 शहर

पुण्यात आता ‘भाऊ’, ‘दादा’, ‘साहेब’ ठरणार फ्लेक्सच्या संख्येवरून! महापालिकेची भन्नाट मोहीम; अनधिकृत फ्लेक्सचा फोटो काढून अशी करा तक्रार

डिजिटल पुणे    24-11-2026 13:27:53

पुणे : पुणे शहरातील रस्ते, चौक आणि गल्लीबोळांमध्ये वाढत चाललेल्या अनधिकृत फ्लेक्सच्या समस्येला आळा घालण्यासाठी पुणे महानगरपालिकेने एक अनोखी मोहीम सुरू केली आहे. राजकीय शुभेच्छा, वाढदिवस, जाहिराती आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणाऱ्या अनधिकृत फ्लेक्समुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता महापालिकेने थेट पुणेकरांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, नागरिकांना फ्लेक्सचा फोटो काढून ऑनलाइन तक्रार करता येणार असून, तक्रारदाराची ओळखही गोपनीय ठेवली जाणार आहे.

महापालिकेच्या या उपक्रमाला 'भाऊ फ्लेक्स काढा' असे नाव देण्यात आले आहे. यासाठी प्रशासनाने https://bhauflexkadha.pmc.gov.in/ हे स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. या माध्यमातून शहरातील कोणत्याही भागात आढळणाऱ्या अनधिकृत फ्लेक्सची माहिती नागरिकांना थेट महापालिकेपर्यंत पोहोचवता येणार आहे.

फ्लेक्स दिसला की फोटो काढा आणि पोर्टलवर अपलोड करा!

नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी महापालिकेने सोपी प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे. आपल्या परिसरात किंवा रस्त्यावर अनधिकृत फ्लेक्स आढळल्यास त्याचा फोटो काढून संबंधित पोर्टलवर अपलोड करायचा आहे. त्यानंतर फ्लेक्स नेमका कोणत्या ठिकाणी लावण्यात आला आहे, याचे लोकेशनही नोंदवता येणार आहे. फोटो आणि ठिकाणाची माहिती मिळाल्यानंतर महापालिका प्रशासनाला संबंधित फ्लेक्सवर कारवाई करणे शक्य होणार आहे.

या पोर्टलवर फोटो अपलोड करणे, लोकेशन शेअर करणे आणि कारवाईची माहिती मिळवणे अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, तक्रार करणाऱ्या नागरिकाचे नाव किंवा ओळख उघड केली जाणार नसल्याचे पोर्टलवर स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही दबावाची किंवा ओळख उघड होण्याची चिंता न करता नागरिकांना तक्रार दाखल करता येणार आहे.

तक्रार केल्यानंतर कारवाई कुठपर्यंत आली, हेही समजणार

केवळ तक्रार नोंदवून थांबावे लागणार नाही, तर त्यावर झालेल्या कार्यवाहीची माहितीही नागरिकांना मिळणार आहे. तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित व्यक्तीला एक संदर्भ क्रमांक दिला जाईल. या क्रमांकाच्या मदतीने पोर्टलवरील तक्रार तपासणीच्या पर्यायातून तक्रारीची सद्यस्थिती जाणून घेता येईल. त्यामुळे महापालिकेने तक्रारीवर काय कार्यवाही केली, याचा मागोवा घेणेही शक्य होणार आहे.

'भाऊ', 'दादा', 'साहेब' किताबांची अनोखी वर्गवारी!

या संपूर्ण मोहिमेतील सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे 'शहर विद्रूपीकरण पुरस्कार २०२६'. शहरात अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्या ब्रँड्स आणि व्यक्तींची माहिती या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोर्टलवर यासाठी 'ब्रँड्स' आणि 'माननीय' असे दोन स्वतंत्र विभाग तयार करण्यात आले आहेत.

'माननीय' विभागात फ्लेक्स लावण्याच्या प्रमाणानुसार तीन वेगवेगळे किताब निश्चित करण्यात आले आहेत. गल्लीमध्ये फ्लेक्स लावणाऱ्यांसाठी 'भाऊ', प्रत्येक चौकात फ्लेक्स लावणाऱ्यांसाठी 'दादा', तर संपूर्ण शहरभर फ्लेक्स लावणाऱ्यांसाठी 'साहेब' अशी उपरोधिक वर्गवारी करण्यात आली आहे. त्यामुळे अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांना या अनोख्या पुरस्कारांच्या माध्यमातून आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या पुरस्कारांसाठी नोंदणी आणि प्रवेशिका सादर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोर्टलवर देण्यात आली आहे. तसेच पुढील २४ तासांत पुरस्कार जाहीर केले जाणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

पुणेकरांच्या सहभागातून शहराचे विद्रूपीकरण रोखण्याचा प्रयत्न

शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी केवळ महापालिकेची नसून नागरिकांचाही त्यात महत्त्वाचा सहभाग आहे. याच उद्देशाने पुणे महापालिकेने अनधिकृत फ्लेक्सविरोधात ही ऑनलाइन मोहीम सुरू केली आहे. आता पुणेकरांनी आपल्या परिसरातील अनधिकृत फ्लेक्सचा फोटो आणि लोकेशन पोर्टलवर पाठवून प्रशासनाला सहकार्य करायचे आहे. नागरिकांकडून मिळणाऱ्या तक्रारींच्या आधारे अनधिकृत फ्लेक्स हटवण्याची कारवाई केली जाणार असल्याने या मोहिमेला पुणेकरांचा किती प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती