उत्तर प्रदेश : शालेय सहलीचा आनंद घेऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा भीषण दुर्घटनेने अंत झाला. आग्रा-लखनौ द्रुतगती मार्गावर उभ्या असलेल्या शाळेच्या बसला भरधाव ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून २४ हून अधिक विद्यार्थी आणि शालेय कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींपैकी शाळेचे प्राचार्य आणि एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (२४ नोव्हेंबर) सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास कन्नौज जिल्ह्यातील थथिया परिसरातील बैसुइया गावाजवळ हा अपघात घडला. कौशांबी जिल्ह्यातील सिराथू येथील ओरिएंटल पब्लिक स्कूलचे विद्यार्थी दोन दिवसांच्या सहलीसाठी आग्रा येथे गेले होते. रविवारी सहलीसाठी निघालेली ही विद्यार्थ्यांची बस सहल संपवून कौशांबीच्या दिशेने परतत होती. बसमध्ये सुमारे ५० विद्यार्थी, शिक्षक आणि शाळेतील कर्मचारी प्रवास करत होते.
विद्यार्थ्यांसाठी बस थांबवली अन् मागून ट्रकची धडक
प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांना लघुशंकेसाठी जाता यावे, यासाठी चालकाने आग्रा-लखनौ द्रुतगती मार्गावरील २०९ क्रमांकाच्या कटजवळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली होती. विद्यार्थी बसमधून उतरण्याच्या तयारीत असतानाच पाठीमागून वेगाने आलेल्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले. बस दुभाजकाला धडकून उलटली. या घटनेनंतर बसमधील विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला.
चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू; गंभीर जखमींना मेडिकल कॉलेजमध्ये हलवले
या अपघातात आर्यन चौरसिया (१४), राझी उल्लाह (१७), झैद मिर्झा (१७) आणि अरमान (१७) या चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत २४ हून अधिक विद्यार्थी आणि शाळेचे कर्मचारी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी असलेल्या शाळेच्या प्राचार्यांसह एका विद्यार्थ्याला पुढील उपचारांसाठी तिर्वा मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले आहे. इतर जखमींवरही उपचार सुरू आहेत.
जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून पाहणी
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कन्नौजचे जिल्हाधिकारी आशुतोष मोहन आणि पोलीस अधीक्षक विनोद कुमार यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तसेच त्यांना योग्य वैद्यकीय उपचार मिळत असल्याची खात्री केली.
पोलीस अधीक्षक विनोद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग्रा येथून कौशांबीच्या दिशेने परतणाऱ्या शाळेच्या बसला मागून ट्रकने धडक दिली. या दुर्घटनेत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून २४ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी प्राचार्य आणि एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर आहे.
सहलीचा आनंद क्षणात शोकांतिकेत बदलला
दोन दिवसांच्या सहलीनंतर घरी परतण्याची उत्सुकता असलेल्या विद्यार्थ्यांवर काळाने अचानक घाला घातला. ज्या सहलीच्या आठवणी विद्यार्थ्यांसाठी आनंददायी ठरणार होत्या, त्याच सहलीचा प्रवास चार कुटुंबांसाठी आयुष्यभराची वेदना देणारा ठरला आहे. या दुर्घटनेमुळे मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.