सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पेपरफुटी करणाऱ्यांवर आता 10 कोटींचा दंड; 10 वर्षांपर्यंत कारावास, उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी, परीक्षार्थींना मोठ्या दिलासा मिळण्याची शक्यता
  • राज्यात पुन्हा 'ऑपरेशन टायगर'च्या हालचाली, ठाकरे गटाचा नेता मुंबईतील शिंदे सेनेच्या बैठकीला, चर्चांना उधाण
 विश्लेषण

पेपरफुटी करणाऱ्यांची खैर नाही! १० कोटींचा दंड, १० वर्षांपर्यंत तुरुंगवास; MPSC परीक्षार्थींनाही मोठा दिलासा

डिजिटल पुणे    24-11-2026 16:01:07

मुंबई : राज्यातील स्पर्धा परीक्षा आणि सरकारी भरती प्रक्रियेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी आता कठोर पावले उचलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पेपरफुटी, परीक्षेतील कॉपी आणि संघटित गैरप्रकारांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर तब्बल १० कोटी रुपयांपर्यंत दंड आणि १० वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद करण्याची शिफारस करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने सादर केलेल्या दुसऱ्या अहवालात परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण बदल सुचवले आहेत.

भरती आणि स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या समितीने दोषींवर कठोर कारवाई करण्याची भूमिका मांडली आहे. संघटित पद्धतीने पेपरफुटी किंवा परीक्षेतील गैरप्रकार घडवून आणणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना ७ ते १० वर्षांपर्यंत कारावास, किमान १० कोटी रुपयांचा दंड तसेच संबंधितांची मालमत्ता जप्त करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

परीक्षेदरम्यान अनुचित साधनांचा वापर करणाऱ्यांनाही कठोर शिक्षेची तरतूद सुचवण्यात आली आहे. अशा प्रकरणांमध्ये दोषींना ५ ते १० वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्याची शिफारस आहे. तसेच परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्या सेवा पुरवठादार संस्थांना ५ कोटी रुपयांपर्यंत दंड आणि आठ वर्षांपर्यंत बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

गैरप्रकारांच्या तपासासाठी STF आणि विशेष न्यायालये

 

परीक्षांमधील गैरप्रकारांचा तपास अधिक प्रभावीपणे व्हावा, यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तपास करण्याची सूचना देण्यात आली आहे. गंभीर स्वरूपाच्या प्रकरणांसाठी विशेष कृती दल अर्थात एसटीएफ स्थापन करण्याचा प्रस्तावही अहवालात आहे. याशिवाय अशा प्रकरणांमधील खटले लवकर निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

MPSC परीक्षार्थींसाठी महत्त्वाची शिफारस

या अहवालातील सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे एमपीएससीच्या परीक्षार्थींना मिळू शकणारा आर्थिक दिलासा. परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण परीक्षा शुल्क परत करण्याची शिफारस समितीने केली आहे. तसेच उत्तरतालिकेवर उमेदवाराने घेतलेली हरकत योग्य ठरल्यास त्यासाठी भरलेले शुल्कही परत देण्याची तरतूद सुचवण्यात आली आहे.

उमेदवारांना परीक्षेचे नियोजन आधीपासून करता यावे, यासाठी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत पुढील वर्षाचे वार्षिक परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्याची सूचना करण्यात आली आहे. उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आधार किंवा MahaID च्या माध्यमातून एकदाच नोंदणी करण्याची सुविधाही प्रस्तावित आहे.

परीक्षा व्यवस्थेत होणार तंत्रज्ञानाचा वापर

परीक्षा प्रक्रियेवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी त्रिस्तरीय कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्याची शिफारस करण्यात आली आहे. राज्यातील रिक्त पदांची माहिती वेळेत उपलब्ध व्हावी आणि भरती प्रक्रियेला गती मिळावी, यासाठी इंटिग्रेटेड रिक्विझिशन पोर्टल विकसित करण्याचा प्रस्ताव आहे.

तसेच प्रत्येक वर्षी सप्टेंबरअखेरपर्यंत संबंधित विभागांनी भरतीचे मागणीपत्र एमपीएससीकडे पाठवावे, अशी सूचना करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र परीक्षा शाखा स्थापन करण्याबरोबरच परीक्षा केंद्रांची स्वतंत्र बँक तयार करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांची निवड आणि व्यवस्थापनाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्याचा प्रस्ताव आहे.

परीक्षा प्रक्रियेतील संभाव्य सायबर हल्ले आणि तांत्रिक गैरप्रकार रोखण्यासाठी स्वतंत्र तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षा कक्ष स्थापन करण्याची सूचनाही अहवालात करण्यात आली आहे.राज्यातील भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशाने ४ सप्टेंबर २०२६ रोजी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीचा दुसरा अहवाल २३ नोव्हेंबर २०२६ रोजी शासनाला सादर करण्यात आला आहे. आता या अहवालातील शिफारशींची शासनाकडून अंमलबजावणी झाल्यास राज्यातील स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेत मोठे बदल घडून येण्याची शक्यता आहे.


 Give Feedback



 जाहिराती