सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पेपरफुटी करणाऱ्यांवर आता 10 कोटींचा दंड; 10 वर्षांपर्यंत कारावास, उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी, परीक्षार्थींना मोठ्या दिलासा मिळण्याची शक्यता
  • राज्यात पुन्हा 'ऑपरेशन टायगर'च्या हालचाली, ठाकरे गटाचा नेता मुंबईतील शिंदे सेनेच्या बैठकीला, चर्चांना उधाण
 शहर

पुण्यात बेशिस्त दुचाकीस्वारांचा धुमाकूळ! विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांचा आकडा साडेपाच लाखांवर; मोबाईलवर बोलणाऱ्यांवरही हजारोंची कारवाई

डिजिटल पुणे    24-11-2026 19:04:25

पुणे : पुणे शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वाहतूक पोलिसांकडून सातत्याने जनजागृती आणि दंडात्मक कारवाई केली जात असतानाही काही वाहनचालकांकडून नियमांना केराची टोपली दाखवली जात आहे. विशेषतः विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, नो एन्ट्रीमध्ये प्रवेश करणे आणि दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलणे, अशा प्रकारांमुळे रस्त्यांवरील अपघातांचा धोका वाढला आहे.

पुणे वाहतूक शाखेच्या आकडेवारीनुसार, २०२६ मध्ये २३ नोव्हेंबरपर्यंत विरुद्ध दिशेने तसेच नो एन्ट्रीतून वाहन चालवणाऱ्या तब्बल ५ लाख ५३ हजार ३८१ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, २०२५ या संपूर्ण वर्षात अशाच प्रकारच्या नियमभंगाबद्दल ५ लाख १२ हजार ११२ वाहनचालकांवर कारवाई झाली होती. त्यामुळे यंदा वर्ष संपण्यापूर्वीच मागील वर्षातील कारवाईचा आकडा ओलांडला आहे.

मोबाईलवर बोलत वाहन चालवण्याचे प्रमाणही चिंताजनक

दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलणे हा अपघातांना निमंत्रण देणारा प्रकार ठरत आहे. अनेकजण एका हाताने वाहनाचे हँडल सांभाळत दुसऱ्या हाताने मोबाईलवर बोलताना दिसतात. अशा वेळी रस्त्यावरील परिस्थितीकडे लक्ष देण्यात अडथळा निर्माण होतो. परिणामी वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होण्याची शक्यता वाढते.

वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये मोबाईलवर बोलत वाहन चालवणाऱ्या ४२ हजार ७६२ जणांवर कारवाई करण्यात आली होती. तर २०२६ मध्ये २३ नोव्हेंबरपर्यंत ३२ हजार २९३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई झाली आहे. हा आकडा कमी असला तरी रस्त्यांवर मोबाईलचा वापर करून वाहन चालवणाऱ्यांची समस्या कायम असल्याचे दिसून येते.

विरुद्ध दिशेने वाहन चालवण्यामुळे अपघातांचा धोका

शहरातील मध्यवर्ती पेठांपासून उपनगरांपर्यंत अनेक रस्त्यांवर दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने वाहन चालवताना दिसतात. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी किंवा कमी अंतर कापण्यासाठी काहीजण हा धोकादायक मार्ग निवडतात. मात्र, यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांशी धडक होण्याची शक्यता निर्माण होते. अशा प्रकारांमध्ये निष्पाप वाहनचालक आणि पादचाऱ्यांनाही जीव धोक्यात घालावा लागतो.

विशेष म्हणजे, विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना नागरिकांनी जाब विचारल्यास काही ठिकाणी वादावादी आणि हाणामारीचे प्रकार घडत आहेत. काही घटनांमध्ये धारदार शस्त्रांनी हल्ले झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

कठोर कारवाईची नागरिकांकडून मागणी

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाई करून प्रश्न सुटणार नाही, तर अशा वाहनचालकांमध्ये नियमांबाबत गांभीर्य निर्माण होणे आवश्यक आहे. शहरातील विविध चौकांमध्ये सीसीटीव्हीच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष वाहतूक पोलिसांकडून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र, वारंवार नियम मोडणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे किंवा विरुद्ध दिशेने वाहन चालवणे यामुळे केवळ संबंधित चालकाचाच नव्हे, तर रस्त्यावरील इतर नागरिकांचाही जीव धोक्यात येतो. वाहतूक पोलिसांकडून नियमभंग करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, अपघात टाळण्यासाठी पोलिसांच्या कारवाईसोबतच प्रत्येक वाहनचालकाने स्वतःहून वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

 

 


 Give Feedback



 जाहिराती