सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पेपरफुटी करणाऱ्यांवर आता 10 कोटींचा दंड; 10 वर्षांपर्यंत कारावास, उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी, परीक्षार्थींना मोठ्या दिलासा मिळण्याची शक्यता
  • राज्यात पुन्हा 'ऑपरेशन टायगर'च्या हालचाली, ठाकरे गटाचा नेता मुंबईतील शिंदे सेनेच्या बैठकीला, चर्चांना उधाण
 जिल्हा

भिवंडीत शोरमा खाल्ल्याने १७ जणांना विषबाधा; लहान मुलांचाही समावेश, रुग्णालयात उपचार सुरू

डिजिटल पुणे    24-11-2026 19:16:31

भिवंडी : भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका परिसरात शोरमा खाल्ल्यानंतर १७ जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शोरमा खाल्ल्यानंतर अनेकांना उलटी, जुलाब, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. प्रकृती बिघडल्याने सर्व बाधितांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वंजारपट्टी नाका येथील ए.के. शोरमा या दुकानातून शोरमा खाल्ल्यानंतर काही नागरिकांना अचानक त्रास जाणवू लागला. सुरुवातीला मळमळ आणि पोटदुखीचा त्रास झाल्यानंतर काहींना उलटी व जुलाब सुरू झाले. त्यानंतर संबंधितांना उपचारासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीनंतर त्यांना विषबाधा झाल्याचे समोर आले.

या घटनेत एकूण १७ जण बाधित झाले असून त्यांच्यावर भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे बाधितांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. आणखी काही नागरिकांना त्रास होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

दरम्यान, संबंधित खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. तपासणी अहवालानंतर विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

गेल्या काही दिवसांत खाद्यपदार्थांमधून विषबाधा होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने हॉटेल, खाद्यपदार्थ विक्री केंद्रे आणि रस्त्यावरील खाद्य व्यवसायांच्या स्वच्छतेचा व अन्नाच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने नियमित तपासणी आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.


 Give Feedback



 जाहिराती