पुणे : शहरातील अनधिकृत बांधकामे आणि बेकायदा जाहिरात फलकांविरोधात महापालिकेने कारवाई सुरू केली असताना दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. काळेपडळ परिसरात अतिक्रमण हटविण्यास गेलेल्या महापालिका पथकावर दुकानदाराने विटांचा मारा केल्याची घटना घडली. या हल्ल्यात दोन कर्मचारी जखमी झाले असून जेसीबीचेही नुकसान झाले आहे. दुसरीकडे, विमाननगर परिसरात सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी जाहिरात फलक लावल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काळेपडळमध्ये कारवाईला विरोध; कर्मचाऱ्यांवर विटांचा मारा
काळेपडळ येथील चिंतामणीनगर रस्त्यावर एका चायनीज हॉटेलबाहेर उभारण्यात आलेले अनधिकृत पत्र्याचे शेड हटविण्यासाठी सोमवारी (ता. २३) दुपारी महापालिकेचे पथक गेले होते. यावेळी कारवाईला विरोध करत एका दुकानदाराने छतावर चढून कर्मचाऱ्यांच्या दिशेने विटा फेकण्यास सुरुवात केली. या घटनेत दोन कर्मचारी जखमी झाले, तर कारवाईसाठी वापरण्यात आलेल्या जेसीबीचेही नुकसान झाले.
याप्रकरणी अजिंक्य वानखडे (वय ३६, रा. नांदेड सिटी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शाहीद इनामदार (रा. श्रीराम चौक, हडपसर) याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विमाननगरमध्ये बेकायदा जाहिरात फलक; आठ जणांवर कारवाई
दरम्यान, विमाननगर, एअरपोर्ट रस्ता, सिम्बायोसिस महाविद्यालय परिसर आणि म्हाडा कॉलनी परिसरात महापालिकेची परवानगी न घेता जाहिराती लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित जाहिरातदारांनी झाडे, सार्वजनिक भिंती आणि विजेच्या खांबांवर पोस्टर्स व जाहिरात फलक लावून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याप्रकरणी येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे परवाना निरीक्षक मनोज बिडकर (वय ३९) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महापालिकेच्या जाहिरात नियंत्रण नियमावली २०२२ चे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील अनधिकृत अतिक्रमणे आणि विनापरवानगी जाहिरात फलकांविरोधातील कारवाईदरम्यान या दोन घटना समोर आल्याने महापालिका कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा आणि सार्वजनिक मालमत्तेच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.