भिवंडी : शहरातील वंजारपट्टी नाका परिसरात चिकन शोरमा खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या घटनेतील बाधितांची संख्या वाढून ४२ वर पोहोचली असून, यामध्ये एका गर्भवती महिलेसह १० लहान मुलांचा समावेश आहे. सर्व रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वंजारपट्टी नाका येथील ए. के. चिकन शोरमा दुकानातून सोमवारी रात्री काही नागरिकांनी शोरमा खाल्ला होता. त्यानंतर काही वेळातच त्यांना उलटी, जुलाब आणि मळमळ असा त्रास जाणवू लागला. प्रकृती बिघडल्याने बाधितांना स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सुरुवातीला एकाच कुटुंबातील पाच जणांसह १४ ते १७ जणांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, त्यानंतर रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढत गेली आणि हा आकडा ४२ वर पोहोचला. बाधितांमध्ये १७ पुरुष, १४ महिला आणि १० लहान मुलांचा समावेश असून, एका गर्भवती महिलेवरही उपचार सुरू आहेत. रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच भिवंडी महापालिका, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. महापालिकेच्या पथकाकडून संबंधित शोरमा दुकानावर तोडक कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त गिरीश गोष्टेकर यांनी दिली. या घटनेमुळे शहरातील खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेचा आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.