सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पेपरफुटी करणाऱ्यांवर आता 10 कोटींचा दंड; 10 वर्षांपर्यंत कारावास, उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी, परीक्षार्थींना मोठ्या दिलासा मिळण्याची शक्यता
  • राज्यात पुन्हा 'ऑपरेशन टायगर'च्या हालचाली, ठाकरे गटाचा नेता मुंबईतील शिंदे सेनेच्या बैठकीला, चर्चांना उधाण
 क्राईम

पुण्यात गुन्हेगारांचा बेधडक हैदोस! शिवाजीनगर न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर गोळीबाराचा प्रयत्न अन् कोयत्याने सपासप वार; तरुण गंभीर जखमी

गजानन मेनकुदळे    25-11-2026 14:11:48

पुणे : पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीने आता अक्षरशः चिंतेची परिसीमा गाठली आहे. कोयत्याने वार, गोळीबार, टोळीयुद्ध आणि भररस्त्यातील मारहाणीच्या घटनांनी शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेरच रक्तरंजित थरार पाहायला मिळाला. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी एका तरुणाला लक्ष्य करत गोळीबाराचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात तरुणाचे दोन्ही हात छाटल्याची प्राथमिक माहिती असून, तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने संपूर्ण न्यायालय परिसर हादरून गेला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुपारी सव्वा एकच्या सुमारास चार ते सहा हल्लेखोर दुचाकीवरून न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ जवळ आले. त्यांनी संबंधित तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिस्तुलातून गोळ्या न सुटल्याने हल्लेखोरांनी कोयत्याचा आधार घेत तरुणावर निर्घृणपणे वार केले. अचानक घडलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली. न्यायालयात कामानिमित्त आलेले वकील, पक्षकार आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात येत आहेत. हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, यामागे वैयक्तिक वैमनस्य आहे की गुन्हेगारी टोळ्यांमधील संघर्ष, याचा तपास सुरू आहे.

पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचा धाक उरलाय कुठे?

शहरात दिवसाढवळ्या घडणाऱ्या गोळीबाराच्या घटना, कोयत्याने होणारे जीवघेणे हल्ले आणि गुन्हेगारांकडून खुलेआम माजवली जाणारी दहशत यामुळे पुणेकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, ज्या न्यायालयात नागरिक न्यायासाठी धाव घेतात, त्याच न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर अशा प्रकारे हिंसक हल्ला होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.

गजबजलेल्या परिसरात, भरदिवसा आणि न्यायालयासारख्या संवेदनशील ठिकाणी हल्लेखोर इतक्या निर्ढावलेल्या पद्धतीने हल्ला करू शकतात, ही बाब पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे करणारी आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा वचक निर्माण होणार कधी? शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी ठोस आणि कठोर उपाययोजना कधी होणार? पुणेकरांना सुरक्षित वातावरण देण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? असे संतप्त सवाल या घटनेनंतर उपस्थित होत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती