पुणे : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बुधवारी हिंसक हल्ल्याची घटना घडली. न्यायालयात आलेल्या एका तरुणावर सहा जणांच्या टोळक्याने गोळीबार करत धारदार कोयत्याने बेछूट वार केले. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, टोळीयुद्धातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या घटनेच्या वेळी न्यायालयाच्या परिसरात वकिलांसह नागरिकांची मोठी उपस्थिती होती. प्रत्यक्षदर्शी तांबे नावाच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी तरुणाचा पाठलाग करत त्याच्यावर गोळीबार केला. त्यानंतर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. गोळी लागूनही तरुण जीव वाचवण्यासाठी धावत होता. मात्र, काही अंतरावर गेल्यानंतर त्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी खाली बसून दोन्ही हात डोक्याभोवती धरले. तरीही हल्लेखोरांनी त्याच्या हातांवर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात त्याचे दोन्ही हात गंभीररीत्या जखमी झाले असून, एका हाताचा पंजा मनगटाजवळून जवळपास वेगळा झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
हल्ला केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यांच्या ताफ्यात अॅक्सेस आणि अॅक्टिव्हा अशा दोन दुचाकी होत्या. अॅक्सेसवरून चौघे, तर अॅक्टिव्हावरून दोघे असे सहा जण पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरुण गर्दीकडे पाहत होता!
हल्लेखोर पळून गेल्यानंतर गंभीर जखमी झालेला तरुण कसाबसा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पोहोचला. मात्र, काही क्षणांतच तो जमिनीवर कोसळला. त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. त्याला पाहण्यासाठी घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली. रक्ताने माखलेल्या अवस्थेत असलेला हा तरुण डोळ्यांची उघडझाप करत गर्दीकडे पाहत होता. मृत्यूशी झुंज देणाऱ्या या तरुणाची अवस्था पाहून उपस्थित नागरिक आणि वकीलही हादरले. त्यानंतर पोलिसांनी त्याला रिक्षातून तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्याचा जीव वाचू शकला नाही.
घटनास्थळी पिस्तुल आणि काडतुसांची मॅगझीन आढळली
हल्ल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता एक पिस्तुल आणि काडतुसांनी भरलेली मॅगझीन आढळून आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी न्यायालय परिसरातील तसेच आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.
न्यायालयासारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणी दिवसाढवळ्या गोळीबार करून कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.