सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पेपरफुटी करणाऱ्यांवर आता 10 कोटींचा दंड; 10 वर्षांपर्यंत कारावास, उच्चस्तरीय समितीच्या दुसऱ्या अहवालात महत्त्वाच्या शिफारशी, परीक्षार्थींना मोठ्या दिलासा मिळण्याची शक्यता
  • राज्यात पुन्हा 'ऑपरेशन टायगर'च्या हालचाली, ठाकरे गटाचा नेता मुंबईतील शिंदे सेनेच्या बैठकीला, चर्चांना उधाण
 क्राईम

बेलवर बाहेर येताच मंदार किवळेवर जीवघेणा हल्ला! शिवाजीनगर कोर्टाबाहेर कोयत्याने सपासप वार; जुन्या हत्येच्या प्रकरणातून हल्ला झाल्याचा संशय

डिजिटल पुणे    25-11-2026 16:51:25

पुणे : शिवाजीनगर सत्र न्यायालयाच्या परिसरात बुधवारी (ता. २५) दुपारी झालेल्या थरारक हल्ल्याने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. खुनाच्या गुन्ह्यात नुकताच जामिनावर तुरुंगाबाहेर आलेल्या मंदार मारुती किवळे (वय ३५) याच्यावर न्यायालयाबाहेरच पाच ते सहा जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करत हल्ला केला. हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळीबार करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, गोळ्या न झाडल्याने त्यांनी कोयत्याने किवळेवर सपासप वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी सुमारे १.१५ वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर कोर्ट मेट्रो स्टेशनसमोरील रस्त्यावर ही घटना घडली. मंदार किवळे न्यायालयातील तारखेसाठी आला होता. त्याचवेळी दोन दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याला लक्ष्य केले. सुरुवातीला पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पिस्तूल मिसफायर झाल्याने गोळ्या झाडल्या गेल्या नाहीत. त्यानंतर हल्लेखोरांनी कोयत्याने त्याच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात किवळेच्या दोन्ही हातांसह डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

घटनेनंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या किवळेला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या प्राथमिक माहितीनुसार, त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा असून गोळी लागल्याची कोणतीही जखम आढळलेली नाही. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

शुभम चव्हाण हत्येच्या प्रकरणातून बदला घेतल्याचा संशय?

या हल्ल्यामागे वर्षभरापूर्वी झालेल्या खुनाच्या घटनेचा संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. २०२५ मध्ये पुण्यातील कात्रज परिसरात जमिनीच्या वादातून शुभम चव्हाण याची हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या प्रकरणात मंदार किवळे याचाही आरोपी म्हणून समावेश होता. आंबेगाव पोलिसांनी त्याला या प्रकरणात अटक केली होती. तो गेल्या काही काळापासून तुरुंगात होता. नुकताच जामीन मिळाल्यानंतर तो बाहेर आला होता. त्यानंतर काही दिवसांतच त्याच्यावर न्यायालयाबाहेर हल्ला झाल्याने जुन्या वैमनस्यातून हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

संशयितांची ओळख पटली, दोन पिस्तुले जप्त

या घटनेची माहिती देताना पोलीस उपायुक्तांनी सांगितले की, जखमी तरुणाचे नाव मंदार किवळे असून त्याच्यावर शिवाजीनगर कोर्ट मेट्रो स्टेशनसमोर दुपारी सव्वा एकच्या सुमारास हल्ला झाला. प्राथमिक माहितीनुसार, तीन ते चार जणांनी धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले. किवळे हा शुभम चव्हाण खून प्रकरणातील आरोपी असून, तो न्यायालयीन तारखेसाठी आला होता. वैयक्तिक वैमनस्यातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून दोन पिस्तुले जप्त केली असून संशयित आरोपींची ओळखही निष्पन्न झाली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. पिस्तुलातून गोळीबार झाला होता का, यासह हल्ल्याच्या इतर बाबींचा तपास सुरू आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मंदार किवळे याचे कुटुंबीय ससून रुग्णालयात दाखल झाले. आपल्या मुलावर झालेला जीवघेणा हल्ला आणि त्याची गंभीर अवस्था पाहून कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. या घटनेमुळे शिवाजीनगर न्यायालय परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून हल्ल्यामागील नेमके कारण आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती