पुणे : महायुतीमध्ये गैरसमज आणि मतभेद निर्माण करून युतीला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ओंकार (मनोज) शेडजाळे यांनी केला आहे. रवींद्र धंगेकर यांच्या राजकीय भूमिकेवर टीका करत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
रवींद्र धंगेकर हे महायुतीच्या धर्माला हरताळ फासून वैयक्तिक स्वार्थापोटी राजकारण करत असल्याचे दिसून येत आहे. महायुतीतील मित्रपक्षांमध्ये गैरसमज निर्माण करून तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न दुर्दैवी असल्याचे शेडजाळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर धंगेकर यांच्याकडून केली जाणारी टीका कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. राज्यात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे मित्रपक्ष उत्तम समन्वयाने काम करत असताना अशा वक्तव्यांमुळे महायुतीच्या एकजुटीला बाधा पोहोचू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
या संपूर्ण प्रकरणाची महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती भूमिका घ्यावी आणि आवश्यक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा ओंकार (मनोज) शेडजाळे यांनी व्यक्त केली आहे.महायुतीची ताकद ही एकजुटीत आहे, वैयक्तिक स्वार्थाच्या राजकारणात नाही, असा ठाम संदेशही त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून दिला आहे.