सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचं पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
  • 'पाकिस्तानी कंटेंटला भारतात थारा नाही!' पाकच्या 'या' वेबसीरिजवरून केंद्र सरकारनं नेटफ्लिक्सला सुनावलं; भारतात रिलीजवर बंदी
  • शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती, म्हणाल्या, बाबांची तब्येत ठीक आहे
  • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना; 1 लाख रिक्षा वाटप करणार, प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
  • पुणे महापालिकेचा महापौरांना घरचा आहेर; अनधिकृत फ्लेक्सवरून प्रशासनाचा टोला
 क्राईम

पुणे कोर्ट हल्ला प्रकरण !आम्हाला केवळ एकाच ठिकाणी राहतो म्हणून अडकवलं’; आरोपींच्या वकिलांचा कोर्टात दावा, मंदार किवळे हल्ला प्रकरणात ६ दिवसांची कोठडी

डिजिटल पुणे    26-11-2026 16:39:36

पुणे : शिवाजीनगर सत्र न्यायालयाबाहेर मंदार किवळे याच्यावर झालेल्या गोळीबार आणि कोयत्याने हल्ला केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी (२६ नोव्हेंबर) अतिरिक्त मुख्य न्यायाधीश एस. डी. पंजवानी यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी सरकारी पक्ष आणि आरोपींच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला. आरोपींना दोन डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

या प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी तपासासाठी दहा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली वाहने पोलिसांनी जप्त केली असून, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलमधील व्हिडिओंच्या माध्यमातून महत्त्वाचे पुरावे मिळाल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. हल्ल्यात वापरलेले पिस्तूल आणि कोयते कुठून आणले, त्यासाठी कोणाची मदत घेण्यात आली आणि या कटामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास करणे बाकी असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

दुसरीकडे, आरोपींच्या वकिलांनी पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेतला. केवळ एकाच ठिकाणी राहतात म्हणून काही व्यक्तींना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. त्यांचा हल्ल्याशी नेमका काय संबंध आहे, याबाबत प्रश्न उपस्थित करत आरोपींच्या वकिलांनी पोलीस कोठडीला विरोध केला.

दरम्यान, पीडित पक्षाच्या वकिलांनी हा हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा संशय व्यक्त केला. काही आरोपींकडील शस्त्रे अद्याप जप्त झालेली नाहीत, तर या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी सखोल चौकशी आवश्यक असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

नेमका कसा झाला होता मंदार किवळेवर हल्ला?

मंगळवारी (२५ नोव्हेंबर) पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयाच्या परिसरात मंदार किवळे याच्यावर सहा जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला होता. सुरुवातीला आरोपींनी त्याच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र गोळीचा नेम चुकल्यानंतर हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग केला आणि कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात किवळेचे दोन्ही हात गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती.

शुभम चव्हाण हत्या प्रकरणातून हल्ल्याचा बदला?

या हल्ल्यामागे २०२५ मध्ये पुण्यातील कात्रज परिसरात झालेल्या शुभम चव्हाण हत्या प्रकरणाचा बदला असल्याचा प्राथमिक तपासात संशय व्यक्त केला जात आहे. या हत्या प्रकरणात मंदार किवळे आरोपी होता. काही दिवसांपूर्वीच त्याला जामीन मिळाल्यानंतर तो तुरुंगाबाहेर आला होता. त्यानंतर त्याच्यावर पाळत ठेवून हल्ल्याचा कट रचण्यात आल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, शुभम चव्हाणचा भाऊ अक्षय चव्हाण याने या हल्ल्याचा कट रचल्याचा संशय आहे. त्यासाठी १२ ते १५ तरुणांना एकत्र करून हल्ल्याची योजना आखण्यात आल्याची माहिती तपासातून पुढे येत आहे. या कटात आणखी कोणाचा सहभाग होता, हल्ल्यासाठी शस्त्रे आणि वाहने कोणी उपलब्ध करून दिली, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

हल्ल्यानंतर आरोपींनी ‘हम बाप है’ अशा घोषणा देत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून सुरू असून आरोपींच्या पोलीस कोठडीदरम्यान हल्ल्यामागील संपूर्ण कट आणि इतर सहभागी व्यक्तींची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.


 Give Feedback



 जाहिराती