सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचं पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
  • 'पाकिस्तानी कंटेंटला भारतात थारा नाही!' पाकच्या 'या' वेबसीरिजवरून केंद्र सरकारनं नेटफ्लिक्सला सुनावलं; भारतात रिलीजवर बंदी
  • शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती, म्हणाल्या, बाबांची तब्येत ठीक आहे
  • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना; 1 लाख रिक्षा वाटप करणार, प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
  • पुणे महापालिकेचा महापौरांना घरचा आहेर; अनधिकृत फ्लेक्सवरून प्रशासनाचा टोला
 जिल्हा

काळ नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा – मंत्री पंकजा मुंडे यांचे निर्देश

डिजिटल पुणे    26-11-2026 17:46:30

मुंबई : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील काळ नदीच्या वाढत्या प्रदूषणाची गंभीर दखल घेत पर्यावरण व संबंधित विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काळ नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न उपस्थित करून याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत ही कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

माणगाव शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी काळ नदीच्या पाण्याचा वापर केला जातो. नदीपात्रातील जॅकवेलद्वारे पाणी उपसा करून उतेखोल येथील जलशुद्धीकरण केंद्रात त्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र, माणगाव नगरपरिषदेच्या क्षेत्रातून दररोज सुमारे २.८० दशलक्ष लिटर घरगुती सांडपाणी निर्माण होत असून, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी नगरपरिषदेकडे सांडपाणी प्रक्रिया केंद्र (STP) उपलब्ध नाही. त्यामुळे प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याची बाब समोर आली आहे.

या पार्श्वभूमीवर २० नोव्हेंबर २०२६ रोजी प्रादेशिक कार्यालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, रायगड यांच्यामार्फत काळ नदी परिसरातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान नदीच्या काही भागांत काळसर-तपकिरी रंगाची शेवाळसदृश वाढ, पाण्यावर तेलकट तपकिरी तरंगता थर, नदीपात्रात प्लास्टिक व इतर घनकचरा तसेच बांधकामाचा राडारोडा आढळून आला. नदीत प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडले जात असल्याचेही निदर्शनास आले.

या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालय, रायगड यांच्यामार्फत २३ नोव्हेंबर २०२६ रोजी माणगाव नगरपरिषदेला जल प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, १९७४, वायू प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, १९८१ तसेच घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६ अंतर्गत प्रस्तावित आदेश जारी करण्यात आले आहेत. नगरपरिषदेला सात दिवसांच्या आत आपला खुलासा सादर करण्याची संधी देण्यात आली आहे.

काळ नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नगरपरिषदेने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा सादर करावा, घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया केल्याशिवाय त्याचा नदीत विसर्ग होणार नाही, याची दक्षता घ्यावी, तसेच नदीपात्र व नदीकाठावरील घनकचरा आणि बांधकामाचा राडारोडा हटवून त्याची योग्य विल्हेवाट लावावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.


 Give Feedback



 जाहिराती