पुणे : पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांमुळे शहरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच आता १५ ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बॅग आढळल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खबरदारीचा उपाय म्हणून परिसर मोकळा करण्यात आला असून बॉम्बशोधक आणि नाशक पथकासह श्वानपथकाकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट चौकात एक बेवारस बॅग आढळून आली. स्थानिक नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. संशयित बॅगमध्ये नेमके काय आहे, याचा शोध घेण्यासाठी बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी केली जात आहे. मात्र, बॅगेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह राज्यातील विविध महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बस्फोटाच्या धमक्या मिळत आहेत. पुणे-मुंबईसह राज्यातील न्यायालये आणि महापालिका बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली होती. या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. पुणे महापालिकेला धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर शिवाजीनगर न्यायालयालाही दोन वेळा अशाच प्रकारचे ई-मेल प्राप्त झाले होते. त्यानंतर संबंधित ठिकाणी तपासणी करण्यात आली होती.
या घटनांची चर्चा सुरू असतानाच दोन दिवसांपूर्वी शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात मंदार किवळे याच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली. न्यायालयाच्या परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर आज पुण्यात कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित आहेत. शहरातील गुन्हेगारी आणि न्यायालय परिसरातील हल्ल्याच्या घटनेवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
एकीकडे शहरातील सुरक्षेच्या मुद्द्यावर वरिष्ठ स्तरावर बैठक सुरू असतानाच दुसरीकडे १५ ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळल्याने पोलिसांसमोर आणखी एक आव्हान निर्माण झाले आहे. सध्या सुरक्षा यंत्रणांकडून तपासणी सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतरच या बॅगेबाबत अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.