पुणे : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय परिसरात झालेल्या तरुणावरील जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी पोलीस प्रशासनाला कडक निर्देश दिले आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी अधिक सतर्क राहून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले.
पुण्यातील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत सुनेत्रा पवार यांनी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलीस विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपकुमार गिल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
शिवाजीनगर न्यायालय परिसरात घडलेली हल्ल्याची घटना गंभीर असून, अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्यापुरते मर्यादित न राहता गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य द्यावे. गुन्हेगारी टोळ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी गोपनीय माहिती संकलनाची यंत्रणा अधिक प्रभावी करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
शहरात अवैध शस्त्रे बाळगणारे, कोयता गँग आणि अमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी असणाऱ्या टोळ्यांविरोधात विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करावी. अशा गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होईल, अशा पद्धतीने पोलिसांनी काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
याशिवाय शहरातील गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक परिसर आणि संवेदनशील भागांमध्ये पोलीस गस्त वाढवण्यास सांगण्यात आले आहे. नियमित तपासणी करून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे. वाहतूक व्यवस्थेत शिस्त आणण्यासाठीही आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. पोलीस विभागाने आपल्या कामकाजात अधिक सुधारणा करून कार्यक्षमता वाढवावी, असेही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.
शिवाजीनगर न्यायालयातील घटनेवरून संपूर्ण पोलीस दलाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक जबाबदारीने आणि परिणामकारक पद्धतीने काम करणे गरजेचे आहे. आगामी काळात पोलीस दलाचा धाक आणि दबदबा नागरिकांना दिसून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पुण्याची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख जपत शहरातील शांतता व नागरिकांची सुरक्षितता कायम ठेवणे ही पोलिसांची महत्त्वाची जबाबदारी आहे. या दृष्टीने पोलीस प्रशासनाने सतर्क राहावे आणि नागरिकांनीही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.