मुंबई : मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढवणारी घटना समोर आली आहे. स्थानकातील महिला शौचालयात एका ६० वर्षीय महिलेवर २७ वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. महिलेने विरोध केला असता आरोपीने तिला बेदम मारहाण केली. गुरुवारी (२६ नोव्हेंबर) रात्री घडलेल्या या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खडवली येथील ही महिला आपल्या १८ वर्षीय मुलीसोबत कसारा लोकल पकडण्यासाठी घाटकोपर रेल्वे स्थानकात आली होती. लोकलची प्रतीक्षा करत असताना ती फलाट क्रमांक दोन आणि तीनवरील सीएसएमटी दिशेकडील महिला शौचालयात गेली. यावेळी आरोपीने तिचा पाठलाग केला आणि शौचालयात प्रवेश केला. त्यानंतर त्याने महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरडा करत विरोध केला असता आरोपीने तिच्यावर हल्ला केला आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
या मारहाणीत महिलेच्या डोक्याला, चेहऱ्याला आणि छातीला दुखापत झाली. अत्याचारानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. शौचालयातून बाहेर आल्यानंतर जखमी अवस्थेत महिलेने मुलगी आणि रेल्वे पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपीचा माग काढला
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यामध्ये एक संशयित व्यक्ती शौचालयात प्रवेश करून काही वेळातच घाईघाईने बाहेर पडताना दिसून आली. फुटेजच्या आधारे आरोपी मेट्रो स्थानकाच्या दिशेने पळून गेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी कुर्ला जीआरपीकडून सात विशेष पथके तयार करण्यात आली.
२७ वर्षीय तस्लीम नूर मोहम्मद शाहला अटक
पोलिसांनी केलेल्या तपासानंतर आरोपीची ओळख पटली. घाटकोपरमधील असल्फा परिसरात राहणाऱ्या तस्लीम नूर मोहम्मद शाह (वय २७) याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी व्यवसायाने टेलर असल्याची माहिती आहे. त्याने अमली पदार्थांचे सेवन करून हा प्रकार केल्याचा पोलिसांना संशय असून, त्या अनुषंगानेही तपास सुरू आहे.
महिलेची वैद्यकीय तपासणी सुरू
दरम्यान, पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी सुरू असून तिचा सविस्तर जबाब नोंदविण्याची प्रक्रिया बाकी असल्याची माहिती आहे. वैद्यकीय अहवाल आणि महिलेचा जबाब नोंदवल्यानंतर घटनेबाबत अधिक स्पष्टता येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहेत.
या घटनेतील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे संबंधित महिला शौचालयात सुरक्षेसाठी कोणताही कर्मचारी तैनात नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवरील महिला स्वच्छतागृहांची सुरक्षा, सीसीटीव्ही यंत्रणा आणि सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.