नवी मुंबई : नवी मुंबईत भररस्त्यात सिनेस्टाइल दरोड्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोन्याची वाहतूक करणाऱ्या वाहनाला लक्ष्य करत चार अज्ञात दरोडेखोरांनी तब्बल २० कोटी रुपये किमतीचे सोने लुटले. गुरुवारी (२६ नोव्हेंबर) रात्री नेरूळ एमआयडीसी परिसरातील सर्व्हिस रोडवर हा प्रकार घडला. आरोपींनी लोखंडी रॉडने वाहनाच्या काचा फोडून चालकाला मारहाण केली आणि १६ किलो ४०० ग्रॅम सोन्याची बॅग घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण घुरो मुखिया (वय ५५) हे कंपनीचे सोने घेऊन दोन कर्मचाऱ्यांसह वाहनातून जात होते. त्यांचे वाहन शिरवणे एमआयडीसी परिसरातील सर्व्हिस रोडवर आले असता, वॅगनआर कारमधून आलेल्या चार जणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर त्यांनी वाहन अडवले. त्यानंतर हातातील लोखंडी रॉडने वाहनाच्या काचा फोडत आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी चालकाने दरोडेखोरांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्याच्या चेहऱ्यावर लोखंडी रॉडने वार केला. चालक जखमी झाल्यानंतर आरोपींनी वाहनातील सोन्याची बिस्किटे, चेन आणि इतर दागिने असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली. त्यानंतर चौघांनीही ठाण्याच्या दिशेने पळ काढला.
१६ किलो सोन्याची किंमत जवळपास २० कोटी रुपये
या दरोड्यात लुटण्यात आलेल्या सोन्याचे वजन १६ किलो ४०० ग्रॅम असल्याची माहिती समोर आली आहे. या सोन्याची बाजारभावानुसार किंमत अंदाजे २० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. रात्रीच्या वेळी सर्व्हिस रोडवर घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरोड्यापूर्वीच रेकी केल्याचा पोलिसांचा संशय
अवघ्या काही मिनिटांत दरोडेखोरांनी इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं लुटून पलायन केल्याने हा दरोडा पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सोन्याची वाहतूक कोणत्या वाहनातून होणार आहे, तसेच वाहनाचा मार्ग कोणता असेल, याची माहिती आरोपींना आधीच मिळाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे या प्रकरणात कंपनीतील किंवा संबंधित व्यक्तींपैकी कुणी दरोडेखोरांना माहिती पुरवली होती का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासणी; पोलिसांची स्वतंत्र पथके तैनात
घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. याप्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींचे वय अंदाजे २२ ते ३५ वर्षे असल्याची माहिती आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून, आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथके तयार केली आहेत.
दरम्यान, कोट्यवधी रुपयांचे सोने लुटण्यापूर्वी आरोपींनी नेमकी कशी तयारी केली होती? त्यांना सोन्याच्या वाहतुकीची माहिती कुणी दिली होती का? या दरोड्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? या सर्व शक्यतांचा तपास पोलीस करत आहेत.