हिंजवडी : भुमकर चौक येथे एका तरुणावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले. सोमवारी (दि. 17) रात्री दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
याप्रकरणी अजय अशोक पांढरे (वय 26, रा. बनकर वस्ती, वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, स्वप्निल शिंदे उर्फ सोन्या, प्रितेश सुभाष राठोड (वय 20), अनिकेत उर्फ मोन्या अनिल शिंदे (वय 23), गौरव उर्फ नन्या गौतम वाघमारे (वय 23) आणि आकाश आंबोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेशोत्सवातील वादातून हल्ला
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यात गणेशोत्सवाच्या काळात वाद झाला होता. त्याच वादाच्या रागातून सोमवारी रात्री अजय पांढरे यांना रस्त्यात अडवून कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तिघांना अटक, अन्य आरोपी फरार
या प्रकरणी प्रितेश राठोड, अनिकेत शिंदे आणि गौरव वाघमारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, स्वप्निल शिंदे आणि आकाश आंबोरे फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचे हिंजवडी पोलिसांनी सांगितले.या घटनेमुळे हिंजवडी परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास सुरू आहे