मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण क्रिकेट विश्वाला वेध लागलेल्या आयपीएल २०२५ चा नवीन हंगाम आजपासून (दि.२२ मार्च) सुरु होत आहे. यात स्पर्धेचा सलामीचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूध्द कोलकाता नाईट रायडर्स संघात कोलकत्यामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर सायंकाळी ७:३० वाजता खेळविण्यात येणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि जियो हॉटस्टारवर करण्यात येणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळताना २०१४ नंतर तब्बल १० वर्षांनी स्पर्धेचे तिसरे विजेतेपद पटकावले होते. मात्र श्रेयस अय्यर आता यंदाच्या हंगामात पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार असल्याने कोलकाता नाईट रायडर्स मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या ( नेतृत्वात आपले विजेतेपद कायम राखण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. दुसरीकडे आयपीएल २००८ पासून आपल्या पहिल्या विजेतेपदाची प्रतिक्षा असलेला बंगळूरु संघ रजत पटिदारच्या नेतृत्वात स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये उद्घाटनाच्या हंगामात दोन्ही संघांमध्ये पहिला सामना खेळविण्यात आला होता. तब्बल १७ वर्षांनंतर दोन्ही संघांमध्ये सलामी सामना खेळविण्यात येणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्स विरूध्द रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल स्पर्धेत ३५ वेळा आमनेसामने आले आहेत. हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास कोलकाता नाईट रायडर्स संघाने २१ तर आरसीबीने १४ सामने जिंकले आहेत. कोलकाता येथे दोन्ही संघांमध्ये १२ सामने खेळविण्यात आले असून, कोलकाता नाईट रायडर्स संघाने सर्वाधिक ७ आणि आरसीबीने ५ विजय संपादन केले आहेत. दोन्ही संघांमध्ये अखेरच्या ५ सामन्यांच्या निकालावर नजर टाकल्यास कोलकाता नाईट रायडर्स संघाने ४ विजय संपादन केले आहेत. विशेष म्हणजे आयपीएल २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजेतेपद मिळवून देण्यात फील सॉल्ट, सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर वैभव आरोरा हर्षित राणा, श्रेयस अय्यर , वरूण चक्रवर्ती, मिचेल स्टार्क या खेळाडूंनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.
तर विशेष म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स संघाचा विस्फोटक सलामीवीर फलंदाज फील सॉल्ट यंदाच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळताना दिसणार आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या डावाची सुरुवात करण्यासाठी कोणती जोडी सलामीला येणार? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या फलंदाजीची जबाबदारी अजिंक्य रहाणे, क्विंटन डिकॉक, रेहमनुलला गुरबाझ, अंगक्रिश रघुवंशी,मनीष पांडे, रिंकुसिंग, आंद्रे रसेल, यांच्यावर असणार आहे. तर अष्टपैलू खेळाडूंमध्ये आंद्रे रसेल, सुनील नारायण, अनुकूल रॉय, व्यंकटेश अय्यर, रमणदीपसिंग मोईन अली आहेत. गोलंदाजीत हर्षित राणा, वैभव आरोरा, एनरिक नॉरकिया, वरूण चक्रवर्ती, सुनील नारायण, आंद्रे रसेल, स्पेंसर जॉनसन, उमरान मलिक हे पर्याय उपलब्ध आहेत. तर बंगळूरु संघाबद्दल बोलायचे झाल्यास फलंदाजीमध्ये विराट कोहली, रजत पटिदार,फील सॉल्ट, जितेश शर्मा, देवदत्त पडिकल, स्वस्तिक चिकारा, लियम लिंगविस्टन,कुणाल पांड्या हे पर्याय उपलब्ध आहेत.
दरम्यान, अष्टपैलू खेळाडूंमध्ये मध्ये कुणाल पांड्या, लियम लिंगविस्टन,टीम डेव्हिड, स्वप्नील सिंग,रोमारियो शेफर्ड आहेत. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, रसिक दार, सुयश शर्मा,यश दयाल, लुंगी इंगिडी आहेत. दोन्ही संघांमध्ये युवा आणि अनुभवी खेळाडू असल्याने आयपीएल २०२५ मध्ये विजयी सलामी देण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि बंगळूरु मध्ये रंगतदार सामना रंगण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ईडन गार्डन्स कोलकाता नाईट रायडर्स संघाचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाला पराभूत करणे हे बंगळूरु संघासमोर आव्हानात्मक असणार आहे.
