ब्रह्म निरुपण
जे जे काही साकार दिसे | ते ते कल्पांती नासे | स्वरूप ते असतचि असे | सर्वकाळ ||९/२/१||
जे जे काही दिसते ते कल्पांता वेळी नष्ट होऊन जाते. परमात्म स्वरूप मात्र सर्वकाळ असते
नवव्या दशकात, दुसऱ्या समासात श्रीसमर्थ म्हणतात की दृश्याला आतबाहेर व्यापणारे सारतत्त्व तेच भगवंत असून त्याला स्वरूप असे म्हणतात. त्याला ओळखण्यासाठी नाम हा संकेत आहे. नाम रूपाच्या पल्याड असलेल्या त्या तत्वाची कल्पना मन करू शकत नाही. तरी कल्पना येण्यास दृष्टांत द्यावा लागतो. जवळ असून ते दिसत नाही. दिसते ते केवळ दृश्य विश्व. पण चर्मचक्षुंनी पाहणे म्हणजे खरे पाहणे नव्हे. कारण डोळ्यांना जे दिसते ते कधीतरी नष्ट होतेच. हे दृश्य भासमय आणि मिथ्या आहे पण स्वरूप तसे नाही.
मग त्या स्वरूपाची कल्पना येण्यासाठी दृष्टांत द्यावा लागतो. आकाशाला पाहिले की आकाश दिसते, त्याचा भास होतो कारण ते सर्व बाजूने व्यापले आहे. त्याला वेगळेपणाने बघता येत नाही. तसे परमेश्वर सर्व दृश्यांना आतबाहेर व्यापला असल्याने तो इतका निकट असतो की त्याला डोळ्यांनी बघता येत नाही. भगवंत पाण्यात असूनही भिजत नाही, पृथ्वीत व्याप्त आहे तरी झिजत नाही, अग्नीत आहे पण जळत नाही. चिखलात असून बुडत नाही, वाऱ्यात असून उडत नाही आणि सोन्यात असूनही सोन्याप्रमाणे त्याचे दागिने घडवता येत नाहीत.
हे परमात्म स्वरूप सर्वत्र समान आणि भेदरहित आहे. पण मी देह आहे असा अहंकार भेद निर्माण करतो. मी ब्रह्म आहे हाही अहंकार आहे. हे दोन्ही अनुभव खरे नाहीत. कल्पनाच आहेत. हा अहंकार स्वरूपापर्यंत पोहचतो. ही अहंता जिथपर्यंत जाते तिथपर्यंत ती शब्दांनी वर्णन करते. खरे तर अनुभव शब्दात मांडताच येत नाही. स्वरूपाला मर्यादा घालू पाहणाऱ्या कल्पनेतून भावना तयार होते पण स्वस्वरूप मात्र त्या कल्पनेच्या पल्याड अनंत आहे. सद्वस्तु निशब्द असल्याने आपण अंतर्यामी खोलवर शिरून निशब्द स्वरूपाचा शोध घ्यावा.
तो परमात्मा सर्वत्र व्याप्त आहे याला अन्वय असे म्हणतात. तर सर्व दृश्य नाशवंत आहे म्हणून त्यास बाजूला केले तर जे उरते त्याच्याकडे दृष्टी ठेवून विचार करणे यास व्यतिरेक म्हणतात. अर्थात या दोन्हीच्या पलीकडे जाणे गरजेचे असते. स्वरूपाचे वर्णन शब्दात केलेले असते. ते समजून घेणे महत्वाचे असते. तो अर्थ बरोबर समजणे यास वाच्यार्थ असे म्हणतात. हा ध्यानात आला की सद्वस्तुची बरोबर कल्पना करावी. यास लक्ष्यांश म्हणतात.
सर्व ब्रह्म आहे किंवा दृश्य बाजूला सारून जे उरते ते ब्रह्म आहे असे ब्रह्म वर्णन शब्दापुरतेच भिन्न आहेत पण दोन्हींचा लक्ष्यांश म्हणजे जे परब्रह्म ते अगदी एकच आहे तिथे भेद नाही. सर्व ब्रह्म आणि विमल ब्रह्म ही दोन्ही वर्णने वाच्यांशामध्ये आटून जातात. ही वर्णने शब्दांच्या कक्षेतच ते वावरतात. स्वस्वरूप हे दोन्हींचा लक्ष्यांश आहे. तिकडे लक्ष गेले की दोन्ही पक्ष गळून जातात. लक्ष्यांशावर लक्ष केंद्रित करून स्वरूपाचा अनुभव घ्यावा. जिथे शब्द आटतात. या अनुभवाने साधक निशब्दात जातो.
परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चारही वाणी इथे शून्य होतात. शब्द नाशवंत आहेत. ब्रह्म अनुभव म्हणजे स्वरूपाशी अनन्य (अन्य नाही ते अनन्य) होणे होय. अहंता गेली की हा अनुभव येतो. केवळ अद्वैत स्थितीत मी आत्मा आहे अशी आत्मपणाची जाणीव देखील नसते. स्वरूपाविषयी बोलणे थांबवून त्याचे संत वचनांचे मनन, चिंतन केले की आकलन होऊ लागते. मनन करता करता लीन होऊन जावे. मौन होऊन जावे. इथे श्रुती देखील नेती नेती म्हणजे असे नाही असे नाही हे उद्गार काढते. प्रत्यक्ष अनुभव घेतला की हे कळते. हा अनुभव आल्यावर तर्क आणि अनुमानाच्या मागे लागणे म्हणजे अहंकार आहे. या मीचे सर्वच खोटे, काल्पनिक, प्रकृतीजन्य असते. स्वरूपानुभवात ही प्रकृती आणि पुरुष या दोन्हींचा निरास होतो. त्यामुळे या खोट्या मी चे वेगळे अस्तित्व कुठून असणार ?
कथाव्यास/प्रवचनकार/लेखक : श्री. दामोदर रामदासी पुणे. (रामदासी मठ परंपरा, नवगणराजुरी, जिल्हा बीड)