सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • त्रिबंकेश्वर मंदीर अ दर्जाचे तिर्थक्षेत्र म्हणून जाहीर
 व्यक्ती विशेष

अमित शाहांनी जिन्नाना लाजवेल इतकी मुस्लिमांची बाजू घेतली, विधेयकाला नव्हे, भ्रष्टाचाराला विरोध : उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

डिजिटल पुणे    03-04-2025 16:13:41

मुंबई : देशभरामध्ये वक्फ सुधारक विधेयकामुळे वातावरण तापले आहे. लोकसभेमध्ये पहाटेच्या सुमारास हे विधेयक पारित केले आहे. यानंतर आता वक्फ विधेयक हे आज (दि.03) राज्यसभेमध्ये सादर करण्यात येणार आहे. यामुळे विरोधकांनी जोरदार टीकेची झोड उठवली आहे. राज्यातील नेत्यांनी देखील आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाने संसदेमध्ये देखील वक्फ बोर्ड विधेयकाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. यानंतर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. 

मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताला 15 दिवसांपूर्वी कर देण्याबाबत इशारा दिला होता. भारताने त्यांचे कर कमी करावेत अन्यथा टॅरिफ लावण्याचा इशार दिला होता. त्यांनी आता या इशाराप्रमाणे वागण्यास सुरुवात केली आहे. यामुळे शेअर मार्केट कोसळले आहे. देशाच्या पंतप्रधानांनी, देशाच्या अर्थमंत्र्यांनी आणि देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इतर सर्व विषय बाजूला ठेवून देशाला विश्वासात घ्यायला पाहिजे होते. करोना काळात मी मुख्यमंत्री होतो. मोदीही तेव्हा घरी बसूनच काम करत होते. आमच्याशी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग केली होती. तसं काहीतरी करुन मोदींनी अमेरिकेच्या करांबाबत सांगितलं असतं तर आम्ही पाठिंबा दिला असता,” असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

पुढे त्यांनी वक्फ बोर्ड सुधारक विधेयकावरुन निशाणा साधला. ते म्हणाले की, “हे जे अर्थिक स्थितीबाबत घडत आहे ते कोणाला कळू द्यायचं नाही. त्यामुळे हे असे वेगळे विषय काढायचे. नुकतीच ईद झाली. त्या ईदच्या वेळी या सर्वांनी ईदच्या मेजवान्या झोडल्या आहेत. मेजवान्या झोडून ढेकर देऊन हे वक्फ बोर्डाचे विधेयक आणले आहे. किरण रिजेजू यांनी गोमांस खाण्याचं समर्थन केलं होतं. त्यांनीच हे बिल मांडलं हा एक विलक्षण योगायोग आहे. नेमकं भारतीय जनता पक्ष करत काय आहे हेच कोणाला कळत नाहीये,” असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, “कधी सांगतात औरंगजेबाची कबर खोदा, यांचे लोक कुदळ, फावडी घेऊन जातात मग वरुन आदेश येतो की थांबा खोदू नका. मग परत माती टाकतात. मशिदीत घुसून मारणार सांगतात, मारायला गेलं की सांगायचं थांबा, सौगात ए मोदी घेऊन जा. लोकांना एकमेकांमध्ये लढवायचं आणि त्यावर आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजायच्या हे चाललं आहे. भाजपचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत असा आमचा अनुभव आहे,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपवर केली आहे.

वक्फ बोर्डाचे असणाऱी कोट्यवधींची जमीन लाटण्याचा हा प्लॅन असल्याची आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, “वक्फच्या जमिनी ताब्यात घेणार हे दिसतंय म्हणजेच यांचा जमिनींवर डोळा आहे. मोहम्मद अली जिना यांनाही लाजवेल अशी मुस्लिमांची बाजू अमित शाह यांच्यापासून सगळ्यांनी काल केली. देशाच्या इतिहासात मुस्लिम समाजाचा कळवळा आणणारी भाषणं सगळ्यांनी केली. हे बिल मुस्लिमांच्या बाजूने आहे की विरोधात आहे? जर बाजूने असेल तर मग तुम्ही हिंदुत्व सोडलं का? तुम्ही आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवू नका. १९९५ मध्ये सत्ता आली होती तेव्हा इस्तेमासाठी दिली होती, आज बरोबर तिच जागा तुम्ही बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या घशात घातली गेली आहे असाही आरोप उद्धव ठाकरेंनी केला. तसंच हे तुमचं हिंदुत्व आहे का?” असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.


 Give Feedback



 जाहिराती