ज्ञानी जनांची नि:संदेह स्थिती (भाग १)
सकळ करून अकर्ता | सकळ भोगून अभोक्ता | सकळांमध्ये अलिप्तता | येईल कैसी ||९/३/२||
सगळे करून अकर्ता आणि सगळे भोगून अभोक्ता अशी सर्वात राहून अलिप्त स्थिती कशी येईल ?
यस्य अमतं तस्य मतं मतं यस्य न वेद स: |
अविज्ञातं विजानतां विज्ञातम अविजानताम् ||
ते आत्मतत्व मला कळाले नाही असे ज्यांना वाटते त्यांना ते कळाले असते. आणि जो आत्मतत्त्व मला कळाले आहे असे म्हणतो त्याला ते कळाले नाही असेच समजावे. असे केनोपानिषदामध्ये म्हटले आहे. तरी ज्ञानी लोकांना आपला अनुभव मांडण्यासाठी अज्ञानी लोकांच्या भाषेत बोलावे लागते. भलेही ते गूढ असले तरी.
९ व्या दशकाच्या दुसऱ्या समासाच्या शेवटी - करून काहीच न करावे ! असे श्रीसमर्थ म्हणतात. यावर श्रीसमर्थांना श्रोता प्रश्न विचारतो की ब्रह्मज्ञान असे कसे असते ? सर्वात राहून अलिप्तपणा कसा येऊ शकतो ? योगी भोग भोगून अभोक्ता जर राहत असेल तर मग स्वर्ग, नर्क यांच्या भोगांना हा अभोक्तेपणाचा नियम लागू करायला पाहिजे. जन्म व मृत्यूचे भोग भोगावेच लागतात. भोगाच्या यातना भोगूनही योगी ते भोगत नाही असे कसे म्हणावे ? याचा अर्थ योगी पुरुष मार खाऊन मार खात नाही, कण्हतो पण कण्हत नाही. त्याला जन्म नसून जन्म घेतो, पतित नसून पतित होतो. असे अनेक विचार येतात.
श्रोत्याचे हे ऐकून तो वैचारिक आडरानात शिरला आहे हे वक्त्याला जाणवले. तेव्हा वक्ता म्हणाला – तुझा अनुभव जसा आहेस तसाच तू अर्थ काढून बोलत आहेस. पण जसे संपत्ती नसलेला व्यक्ती मोठे साहस करू शकत नाही, तसे ज्ञान नसलेल्या अननुभवी माणसाला ज्ञानी पुरुषाच्या व्यापक अनुभवाची कल्पना शक्य होत नाही. आत्मज्ञानाची संपदा नसलेल्या आणि शब्दज्ञानापर्यंतच मर्यादा असलेल्या माणसाकडे अज्ञानरुपी दारिद्र्य असते. त्यामुळे तो अनेकदा तीच तीच दु:खे भोगतो.
ज्ञानी पुरुषाची अवस्था दुसरा ज्ञानी पुरूषच ओळखू शकतो. एक चतुर दुसऱ्या चतुर माणसाला ओळखतो. सर्वात राहूनही ज्यास अलिप्तपणा कळाला तोच दुसऱ्या अलिप्त पुरुषाची स्थिती जाणू शकतो. जो स्वत: विदेह आहे तोच दुसऱ्या विदेही सिद्धाला बघून देहभान विसरतो. केवळ देहाकडे बघितले तरी सिद्ध देखील बद्ध माणसासारखा दिसेल आणि बद्ध एखाद्या सिद्धासारखा दिसेल. या दोघांची स्थिती एकच आहे जो म्हणतो त्यास मूर्खच म्हणावे. भूतबाधा झालेला आणि ती बाधा नाहीसी करणारा पंचाक्षरी दिसायला एका जरी वाटले तरी त्यांची योग्यता भिन्न असते.
ज्यास स्वरुपानुभव आलेला आहे त्याला ओळखण्यासाठी त्याच्या स्थितीपर्यंत जाणे महत्वाचे आहे. आत्मज्ञानाने ज्याचा मी पणा गुप्त झालेला आहे, विवेकाने जो स्वरूपात विरून गेला आहे, असा पुरुष अनन्य झाल्याने तो वेगळेपणाने आता उरला नाही.
क्रमश: ...
कथाव्यास/प्रवचनकार/लेखक : श्री. दामोदर रामदासी पुणे. (रामदासी मठ परंपरा, नवगणराजुरी, जिल्हा बीड)