सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात नाना पेठ येथील वाड्याला लागली भीषण आग,आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही .
 जिल्हा

चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त मानाच्या सासनकाठींचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते पूजन, मंत्री शंभुराज देसाई यांची उपस्थिती

डिजिटल पुणे    12-04-2025 17:31:00

कोल्हापूर : राज्यातील प्रत्येक माणसाच्या जीवनात आनंद आणि उत्साहाचे क्षण यावेत यासाठी राज्याच्या सर्वांगीण विकासासह वेगवान प्रगतीसाठी दख्खनचा राजा श्री जोतिबाकडे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी साकडे घातले. राज्यातील सर्व नागरीकांना आरोग्यसंपन्न, सुखी व आनंदी राहू दे अशी प्रार्थना त्यांनी केली. त्यांच्या हस्ते चैत्र पौर्णिमा जोतिबा यात्रेनिमित्त मानाच्या सासनकाठींचे पूजन करण्यात आले. महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री जोतिबा देवाच्या भेटीसाठी आलेल्या भाविकांची लाखोंच्या संख्येने उपस्थिती होती. गुलालाने नाहून निघालेल्या लाखो भाविकांनी दख्खनचा राजा श्री जोतिबा डोंगर गुलाबी रंगात अगदी फुलून गेला होता.

यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, गट विकास अधिकारी सोनाली माडकर, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, महादेव दिंडे, धैर्यशील तिवले उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी मंदिरात जोतिबा देवाचे दर्शन घेतले.

सकाळी पहाटे पाच वाजता शासकीय अभिषेक संपन्न झाला. दुपारी बारा वाजता पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर सासनकाठी मिरवणुकीला प्रारंभ झाला. या मिरवणुकीमध्ये क्रमवारे पहिला मान पाडळी जि. सातारा या सासनकाठीचा असतो. त्यानंतर मौजे विहे ता. पाटण, नंतर करवीर कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण, कोल्हापूर छत्रपती, कसबा डिग्रज ता. मिरज, कसबा सांगाव ता. कागल, किवळ जि. सातारा, कवठेएकंद जि. सांगली यांच्यासह मानाच्या एकूण १०८ सासनकाठ्या सहभागी झाल्या. यावर्षी प्लास्टिकमुक्त यात्रा पार पाडण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे २५ हजारावर कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

परिसरातील सर्व दुकानदारांना प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्या वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या तसेच डोंगरावर ३० ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर लावण्यात आले. अन्न औषध प्रशासनाकडून तपासणी, पार्किंगची 34 ठिकाणी व्यवस्था, विविध ठिकाणी अन्नछत्र, दर्शन रांग व्यवस्था, सुरक्षेसाठी सीसीटिव्ही, पोलीस बंदोबस्त, पाण्याची सोय, आरोग्य सुविधा, स्वच्छता, लाईव्ह दर्शन व्यवस्था करण्यात आली होती. पोलीस प्रशासनाकडून जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गर्दीच्या ठिकाणी सनियंत्रणासाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

गुलाल खोबऱ्याची उधळण करीत जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात लाखो भाविकांची जोतिबा डोंगरावर उपस्थिती

जोतिबाच्या नावानं चांगभलं…. म्हणत देशभरातले भाविक आज जोतिबा डोंगरावर उपस्थित राहिले. गुलाल खोबऱ्याची उधळण, ढोल आणि हालगीच्या तालावर नाचवल्या जाणाऱ्या सासनकाठ्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होत्या. नवसाला पावणारा देव म्हणून जोतिबा प्रसिद्ध आहे. त्यामुळं कोण नवस फेडायला तर कोण नव्यानं साकडं घालायला जोतिबा डोंगरावर येतो. ज्योतिबाच्या नावानं चांगभलंचा जयघोष करत गुलाल, खोबऱ्याची उधळण करीत श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा देवाची लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात यात्रा पार पडली. चैत्र यात्रेचे मुख्य आकर्षण असणाऱ्या सासनकाठी मिरवणुकीसाठी मानाच्या सासनकाठ्या डोंगरावर दाखल झाल्या आणि चांगभलंच्या गजराने अवघा डोंगर दुमदुमून गेला. डोंगरवाटा भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या तसेच बैलगाडी, खासगी वाहनातून, चालत भाविक डोंगरावर दाखल झाले. जोतिबा मंदिरात पहाटे धार्मिक विधीनंतर सोहळ्यास प्रारंभ झाला.


 Give Feedback



 जाहिराती