पुणे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त नवी सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबूरावजी घोलप महाविद्यालयात बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप, महाविद्यालय विकास समिती सदस्य प्रा. विजय घारे, डॉ. अर्जुन डोके, महाविद्यालय परीक्षा अधिकारी डॉ. नरसिंग गिरी, वरीष्ठ लिपिक अनुरिता गायकवाड आदी उपस्थित होते.
आपल्या मनोगतामध्ये प्राचार्या डॉ. संगीता जगताप यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कार्याने भारतच नव्हे तर संपूर्ण जगाला वैचारिक दिशा दिलेली असुन बाबासाहेबांचा समग्र वैचारिक दृष्टिकोन लक्षात घेऊन युवा पिढीने एकत्र येत बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मत व्यक्त केले. तसेच इतिहास विभागातील डॉ. ज्योती रामोड यांनी बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकत साहित्य, शिक्षण, सामाजिक, राजकीय, आर्थिक या क्षेत्रातील त्यांच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुवर्णा खोडदे तर आभार प्रदर्शन डॉ. अनिल लोंढे यांनी केले. यावेळी मोठय़ा संख्येने विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.