पुणे : पुण्यातील तनिषा भिसे हिच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोप केले जात आहे. या प्रकरणात दोन अहवाल प्राप्त झाले असून उद्या ससून रुग्णालयाच्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल प्राप्त होणार आहे. याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी भाष्य केलं आहे. "तनिषा भिसे हिची खाजगी माहिती रुग्णालयाकडून सार्वजनिक करण्यात आली आणि याबाबत अलंकार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील भिसे कुटुंबाकडून देण्यात आलीय. गुन्हा नोंद होत असताना ससून रुग्णालयाचा अहवाल येणे बाकी आहे. उद्या तो अहवाल प्राप्त होणार आहे. पहिल्या दिवसांपासून याचा पाठपुरावा केला जात आहे. जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाणार आहे. पुढे कोणतीही तनिषा भिसे घडू नये, याची जबाबदारी आम्ही घेतलीय", असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलंय.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीच्यानिमित्तानं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सोमवारी पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी रूपाली चाकणकर म्हणाल्या की, "खरं म्हणजे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्यांनी दिला, त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी आज नतमस्तक झाले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचे पद हे देखील संविधानिक असून ते पद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेमुळं माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातील महिलेला मिळालं आहे. हे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे", असं यावेळी रुपाली चाकणकर यांनी सांगितलं.
दरम्यान, दीनानाथ रुग्णालय प्रकरणी दोन अहवाल येऊनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. याबाबत रूपाली चाकणकर यांना विचारलं असता, त्या म्हणाल्या की, "दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे धर्मादाय रुग्णालय आहे. त्यामुळं धर्मदायचा अहवाल असणं गरजेच आहे. तसंच, माता मृत्यू असल्यानं माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल असणं देखील गरजेचं आहे. याशिवाय, ससून रुग्णालयाच्या उच्च समितीचा अहवाल सुद्धा अजूनही आला नसून तो उद्या अहवाल प्राप्त होणार आहे आणि त्यानुसार कायदेशीर कारवाईही केली जाणार आहे. तात्पुरत्या स्वरूपातील कोणतीही कारवाई होणार नाही तर पुढे कोणत्याही प्रकारे तनिषा भिसे पुन्हा घडवू नये, यासाठी जो अहवाल येईल. त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलंय.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजित पवार यांच्यावर नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत रुपाली चाकणकर यांना विचारलं असता, त्या म्हणाल्या की "महायुती सरकार अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. जे कोणी असं सांगत असतील, त्याला महायुती सरकार एकत्र काम करत असल्याचं बघवत नसेल. राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उत्तम काम करत आहे. यामुळं अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये", असं रूपाली चाकणकर यांनी सांगितलं. तसंच, फुले चित्रपटासंदर्भात रूपाली चाकणकर म्हणाल्या की, "आजपर्यंत जेवढे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यात सेंसर बोर्डाने कोणतीही काटछाट केलेली नाही. त्यामुळे फुले चित्रपटाच्याबाबतीत देखील कोणतीही काटछाट न करता हा चित्रपट आहे, तसाच प्रदर्शित करण्यात यावा", असंही रूपाली चाकणकर म्हणाल्या.