मुंबई - विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134 वी जयंती देश-विदेशात साजरी केली जातेय. यानिमित्ताने राज्यासह देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. दरम्यान, आज मुंबईतील चैत्यभूमी येथे देशातील अनुयायी येत बाबासाहेबांना मानवंदना देत असून, अभिवादन करताहेत. दुसरीकडे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री आशिष शेलार, मंत्री संजय राठोड, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आदींनी चैत्यभूमीवर जात बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले. दरम्यान, बाबासाहेबांच्या जयंतीचा उत्साह केवळ भारतात नाही तर जगभरात दिसून येत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केलंय.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, बाबासाहेबांच्या कार्यामुळं आज आपण एकसंघ भारत बघतोय, याचे श्रेय बाबासाहेबांना आणि संविधानाला द्यावेच लागेल. संविधानाला 75 वर्ष पूर्ण होतायेत. अमृत महोत्सव साजरा केला जातोय. बाबासाहेबांचे कार्य अतुलनीय आहे. देश तयार करण्यासाठी जो पाया मजबूत लागतो, तो पाया बाबासाहेबांनी तयार केला आणि पूर्वी देशात ज्या चुकीच्या रूढी, परंपरा होत्या, यामुळं मानव मानवाला मानवासारखी वागणूक देत नव्हता. माणूसच माणसाला माणूस म्हणत नव्हता. यातून बाहेर काढण्याचे काम बाबासाहेबांनी केले आणि देशात समता आणि बंधुता स्थापित करण्याचे काम बाबासाहेबांनी केलं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
संविधानाच्या माध्यमातून जगण्यातील समान हक्क आणि अधिकार मिळाला. समान अधिकार मिळाल्याने स्वप्न पूर्ण करण्याचे बळ मिळाले. संविधानाचा गाभा हा भगवान गौतम बुद्धांच्या विचारातून आलाय. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, मला कोणत्याही ग्रंथापेक्षा प्रिय संविधान आहे. कारण संविधान देश घडविण्याचे काम केलंय. संविधानामुळं देश एकसंघ कसा राहील याकडे लक्ष दिले पाहिजे. बाबासाहेब हे कायदेतज्ज्ञ होते. सामाजिक, आर्थिक क्षेत्रात त्यांचा मोठा हातखंडा होता आणि सामाजिक दूरदृष्टी होती म्हणूनच विकासाचा पाया रचणारे बाबासाहेब होते, असं मुख्यमंत्री म्हणालेत.
बाबासाहेबांनी स्वत:चा नाही समाजाचा, स्वत:चा नाही देशाचा, स्वत:चा नाही तर विश्वकल्याणाचा विचार केला. त्यामुळं बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने आमच्यासाठी राष्ट्रपुरुष आहेत. आजची मानवंदना त्या राष्ट्रपुरुषाला आहे आणि त्यांच्याच मार्गाने पुढे जाण्याचा आपण संकल्प करू यात, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर बाबासाहेबांच्या संविधानामुळे देशात तळागळातील लोकांना समान अधिकार आणि हक्क मिळतोय. तसेच बाबासाहेबांनी जीवन देशासाठी समर्पित केले. त्यांच्यामुळं आज गरिबांतील गरीब व्यक्तीही मोठे स्वप्न पाहू शकतो. ती स्वप्न साकार करू शकते आणि ती व्यक्ती मोठी होऊ शकते, असंही राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणालेत.