अहिल्यानगर- कर्जत जामखेडमध्ये मी रोहित पवार यांच्या प्रचारासाठी गेलो होतो. पण लोक माझ्या कानात सांगायचे राम शिंदे कामाचा माणूस आहे, असं अशोक चव्हाण काल एका कार्यक्रमात बोलले होते. नांदेडमध्ये काल सभापती राम शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यात अशोक चव्हाण यांनी त्यांची प्रशंसा केली होती. त्यावरून आमदार रोहित पवार यांनी समाज माध्यमातून अशोक चव्हाण यांच्यावर टीका केलीय.
राम शिंदे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात अशोक चव्हाण यांनी म्हटले होते की, राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापती नियुक्ती करण्यात आलेली नाही, तर त्यांची त्या पदावर बिनविरोध निवड झाली आहे. तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही बिनविरोध निवडून आलात. राम शिंदे यांचा अनुभव दांडगा आहे, ग्रामपंचायतपासून ते विधानसभा, मंत्री आणि आज ते सभापती झाले आहेत, असे कौतुक त्यांनी राम शिंदे यांचे केले होते. तर मला जेव्हा रोहित पवारांनी बोलावले होते, तेव्हा मी कर्जत जामखेड मतदारसंघात गेलो होतो तेव्हा मी दुसऱ्या पक्षात होतो. पण तेव्हा लोक मला कानात सांगत होते, साहेब या ठिकाणी खरा माणूस राम शिंदेंच आहे, असे म्हणत त्यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला.
रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत अशोक चव्हाण यांना प्रत्युत्तर दिले. रोहित पवार म्हणाले की, अशोक चव्हाण साहेब आपण मोठे आणि 'आदर्श' नेते आहात, आपल्याबद्दल माझ्या मनात कायमच आदर आहे. पण आपल्याला भाजपमध्ये का जावं लागलं आणि आज आपल्यासारख्या मोठ्या नेत्याचं स्थान काय आहे? हे आख्ख्या राज्याला माहीत आहे. त्यासाठी कुणालाही कानात सांगायची गरज नाही. राहिला प्रश्न खऱ्या खोट्याचा तर या प्रश्नाचं उत्तर कर्जत-जामखेडने दोनदा दिलंय. महत्वाचं म्हणजे विधानपरिषद, राज्यसभेत जाण्यासाठी मला कुणालाही शरण जावं लागलं नाही, हे खरं आहे की नाही? तुम्हीच सांगा, असे त्यांनी म्हटले.
राज्यसभेत जाण्यासाठी मला कुणालाही शरण जावं लागल नाही, असा टोलादेखील रोहित पवार यांनी लगावलाय. दरम्यान, रोहित पवार यांच्या ट्विटवर अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलंय. लोकशाहीत विरोधकाची प्रशंसा करू नये, अशी अपेक्षा चुकीची आहे. रोहित पवार दोन वेळा आमदार आहेत, याची जाणीव मला आहे. पण राम शिंदे यांचेही काम आहे, अस्तित्व आहे. राम शिंदे नांदेडला आले तेव्हा त्यांच्याबद्दल मी गौरवोद्गार काढले, त्याचं वाईट वाटायचं कारण नाही, असं अशोक चव्हाण म्हणालेत. रोहित पवार यांचं जितकं वय आहे, तितका माझा अनुभव आहे, असे म्हणत अशोक चव्हाण यांनी रोहित पवारांना पुन्हा डिवचले आहे.