नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रायगड किल्ल्यावर जाऊन समाधीस अभिवादन केले. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहा यांच्याविरोधात टीकेची झोड उठवली. त्यांनी केलेल्या या टीकेनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर देताना मोठा दावा केला. ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचे आहे, पण येत नाहीत. त्यामुळे तुम्ही किती टीका करणार आहात? असा सवाल उपस्थित करत चंद्रकांत पाटील यांनी खासदार संजय राऊतांना सुनावले. मात्र पाटील यांच्या आरोपांना संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील आमची चिंता करू नका… सत्तेसाठी आम्हाला अमित शहांचे पाय चाटण्याची आवश्यकता नाही अशा शब्दांत खासदार राऊत यांनी मंत्री पाटील यांना सुनावले.
नाशिक येथे १६ एप्रिल रोजी शिवेसना उध्दव ठाकरे गटाचे निर्धार शिबीर आयोजीत करण्यात आले. या शिबीराच्या नियोजनासाठी खासदार संजय राऊत सध्या नाशिकमध्ये आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांना उत्तर दिले. राऊत म्हणाले की, चंद्रकांत पाटलांनी आमची चिंता करू नये. अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गेबाड यांनी निकालांमध्ये फेरफार करण्यासाठी ईव्हीएम सहजपणे हॅक केले जाऊ शकतात असा दावा केला आहे.
गेबाड या पंतप्रधान मोदींच्या प्रिय मैत्रिण आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आपण कसा विजय मिळवला हे मोदींच्या प्रिय मैत्रिणीनेच सांगितले आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा रायगडावर येतात अन शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करतात हेच शहा औरंगजेबाच्या कबरीला समाधीचा दर्जा देतात त्यांच्या सोबत आम्ही जाणार नाही. अमित शाह यांच्यासोबत उद्धव ठाकरे कधीही जाणार नाही.शाह यांच्यासोबत सत्तेत जाण्यासाठी आम्ही लाचार होणार नाही असे सांगत लांडया लबाड्या करणार्यासोबत आम्ही जाणार नाही, तळवे चाटणार नाही असे ते म्हणाले.
फडणवीस ब्राम्हण मुख्यमंत्री आहेत हे दाखवताय
फुले’ चित्रपटासंदर्भात सुरू असलेल्या वादावर ‘सामना’मधून स्पष्टपणे फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली आहे. फुले चित्रपट सत्यावर आधारित आहे, तरीही ब्राह्मण संघटनांनी विरोध केला, पण फडणवीस गप्प का? असा प्रश्न उपस्थित केला गेला. इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जातो, असे ते म्हणाले. सध्या फुले चित्रपटावरून जो वाद सुरू आहे तो वाद फडणवीस का मिटवू शकत नाहीत. त्यांनी अनेक वाद मिटवले. मराठा समाजाचा वाद मिटवला. सगळयांना टाईट करण्याची भाषा करणारे फडणवीस ब्राम्हण संघटनांना का टाईट करत नाही. ब्राम्हण संघटना फडणवीस शब्दाच्या बाहेर आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शासनाने प्रकाशित केलेल्या साहित्यावरच आधारित हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. छावा, काश्मीर फाईल टॅक्स फ्री केले. सेन्सॉर बोर्डावर तुमचेच चमचे बसले आहेत. त्यांना नामदेव ढसाळ माहिती नाही त्यांना फुले माहिती असणे शक्यता कमी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. परंतू चंद्रकांत पाटील आणि फडणवीस हे सामनाचा अग्रलेख वाचतात त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो अशी टिप्पणीही त्यांनी केली.