सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 जिल्हा

राज्यातील २० आयटीआयमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार

डिजिटल पुणे    15-04-2025 16:51:51

मुंबई : राज्यातील २० आयटीआयमध्ये अत्याधुनिक  प्रयोगशाळा उभारणे, सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी  उद्योजक मेळावे आयोजित करून रोजगार निर्मिती करणे,  राज्यातील आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या तांत्रिक शिक्षण आणि रोजगार संधी वाढवण्यात येणार आहेत. कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि श्री श्री ग्रामीण विकास कार्यक्रम ट्रस्ट बेंगलोर, स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन बेंगलोर, पुण्याची देआसरा फाउंडेशन, अंधेरी येथील प्रोजेक्ट मुंबई या सामाजिक संस्थामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आले.

मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीनंतर कौशल्य विकास विभागाचे सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा मंत्रिमंडळातील सदस्य, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, कौशल्य विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त नितीन पाटील व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख, सहसंचालक सतीश सूर्यवंशी, श्री श्री रुरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त विजय हाके, स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशनच्या सीएसआर प्रमुख रिचा गौतम, दामिनी चौधरी, प्रोजेक्ट मुंबईचे संचालक जलज दानी, दे आसरा या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पंडित  उपस्थित होते. 

श्री श्री रुरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार

युवकांना नवीन तंत्रज्ञान आणि औद्योगिक प्रशिक्षण देण्यासाठी  श्री श्री रुरल डेव्हलपमेंट ट्रस्ट तसेच  स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यात हा त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला.श्री श्री रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम ट्रस्ट ही एक सेवाभावी संस्था असून ही संस्था प्रशिक्षणार्थ्यांना सॉफ्ट स्किल्स, लीडरशिप व व्यवसाय प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगारासाठी तर स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन सामाजिक दायित्व निधीद्वारे देशभरातील युवकांसाठी शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण, रोजगार व स्वयंरोजगार मिळवण्यासाठी विविध उपक्रमांद्वारे कार्य करते.

या कराराच्या माध्यमातून स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन या संस्थेतर्फे येणाऱ्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये राज्यातील 20 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून इलेक्ट्रिशियन या व्यवसायाच्या कार्यशाळाची दर्जा वाढ करण्यात येणार आहे व याचबरोबर सोलार टेक्निशियन लॅब व इंडस्ट्रियल ऑटोमेशन लॅब उभारून देण्यात येणार आहे. तसेच स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन तर्फे राज्यातील वीजतंत्री व्यवसायाच्या सर्व शिल्प प्रदेशांना बेंगलोर येथे आधुनिक तंत्रज्ञान व सॉफ्ट स्किल्सचे पंधरा दिवसांचे प्रशिक्षण मोफत देण्यात येईल. या सामंजस्य करारामुळे पुढील चार वर्षात टप्प्याटप्प्याने 9750 प्रशिक्षणार्थ्यांना  इलेक्ट्रिशियन व अक्षय ऊर्जा क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान व इंडस्ट्रियल ऑटोमेशन या विषयातील प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे.

राज्यातील विविध विभागांतील २० शासकीय आयटीआय केंद्रांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, नाशिक इत्यादी विभागांचा समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत २०२५-२६ पासून पुढील चार वर्षांत प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक वर्षी केंद्रांची संख्या आणि प्रशिक्षणार्थ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. पहिल्या वर्षात १० केंद्रांमध्ये १,५०० युवकांना, दुसऱ्या वर्षात १५ केंद्रांमध्ये २,२५०, तिसऱ्या वर्षात २० केंद्रांमध्ये ३,००० युवकांना आणि चौथ्या वर्षात देखील ३,००० युवकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या सामंजस्य करारामुळे पुढील चार वर्षात टप्प्याटप्प्याने 9,750 प्रशिक्षणार्थ्यांना इलेक्ट्रिशियन व अक्षय ऊर्जा क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान व इंडस्ट्रियल ऑटोमेशन या विषयातील प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे.

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि देआसरा फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार

कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि  पुणे येथील देआसरा फाउंडेशन या संस्थेसोबत उद्योजकता विकासाला चालना देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना प्रशिक्षण, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि व्यावसायिक विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून पाठबळ देणे हा आहे. विविध जिल्ह्यांमध्ये उद्योजक मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांतून ५,००० लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असून, यामध्ये इच्छुक उद्योजक, व्यवसाय सुरू केलेले इनोव्हेटर्स व प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्स सहभागी होतील. देआसरा ही संस्था उद्योजकांना त्यांचा व्यवसाय सुरू करणे आणि वाढवण्यासाठी आवश्यक ती मदत व मार्गदर्शन करते. या सामंजस्य करारांतर्गत ही संस्था व्यवसाय व्यवस्थापन, आर्थिक साहाय्य, विपणन आणि आर्थिक साक्षरता, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण सत्रे आयोजित करणे,  उद्योजकांच्या क्षमता विकसित करणे आणि  उद्योजकतेसाठी योग्य वातावरण तयार करणे हे काम करेल.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आणि प्रोजेक्ट मुंबई सामाजिक संस्था यांच्यात सामंजस्य करार

महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि प्रोजेक्ट मुंबई या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने आयटीआय मधील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या तांत्रिक शिक्षण आणि रोजगार संधी वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार  करण्यात आला आहे.प्रोजेक्ट मुंबई  ही संस्था विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय आहे. सामंजस्य करारांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय सोबत एकत्र येऊन दिव्यांग विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करणार आहे. या करारानुसार एक संयुक्त कार्य समिती स्थापन करण्यात येणार आहे, ज्यामध्ये पाच सदस्य असतील – त्यापैकी  व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून तीन आणि  प्रोजेक्ट मुंबई कडून दोन सदस्यांचा समावेश असेल. ही समिती दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी खास कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम तयार करेल, भारतीय सांकेतिक भाषांमध्ये अभ्यासक्रम विकसित करेल, शिक्षकांचे प्रशिक्षण घेईल आणि उद्योग भागीदारांच्या सहकार्याने  ऑन द जॉब ट्रेनिंग कार्यक्रम आयोजित करेल.


 Give Feedback



 जाहिराती