सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 विश्लेषण

यंदाचा ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांच्यासह 'या' कलाकारांना जाहीर

डिजिटल पुणे    17-04-2025 10:51:55

 मुंबई - यावर्षीच्या मंगेशकर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून उद्योजक आणि पद्मविभूषण कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर संगीत, नाटक, साहित्यासह सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. 24 एप्रिलला सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. 

यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष पद्मविभूषण कुमार मंगलम बिर्ला यांना त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वासाठी आणि भारताच्या विकासाच्या प्रक्रियेत दिलेल्या योगदानासाठी जाहीर करण्यात आला आहे. २०२२ मध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापित केलेला हा प्रतिष्ठित पुरस्कार यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आशा भोसले आणि अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आला आहे. यंदा या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत.

मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांचीही यावेळी घोषणा करण्यात आली आहे. श्रद्धा कपूरला भारतीय चित्रपटसृष्टीतील तिच्या प्रभावी योगदानाबद्दल सन्मानित केलं जाणार आहे. सोनाली कुलकर्णी यांना नाटक आणि चित्रपट क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल सम्मानित करण्यात येणार आहे. हिंदी चित्रपट क्षेत्रातील अभिनेता सुनील शेट्टी यांनाही दीनानाथ पुरस्कारानं सम्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारतीय संगीताच्या क्षेत्रातील प्रतिभावान रीवा राठोडलाही यावेळी पुरस्कृत करण्यात येणार आहे.

मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार सचिन पिळगावकर, रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार शरद पोंक्षे यांच्यासह शास्त्रीय संगीताच्या जगातील दोन प्रतिष्ठित महिलांनाही पुरस्कृत केलं जाणार आहे. दिग्गज व्हायोलिन वादक पद्मभूषण डॉ. एन. राजम यांनाही पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे.

साहित्यात, श्रीपाल सबनीस यांना त्यांच्या वक्तृत्वपूर्ण आणि चिरस्थायी साहित्यिक योगदानासाठी वाग्विलासिनी पुरस्कार प्रदान केला जाईल. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या 'आरंभ सोसायटी फॉर ऑटिझम अँड स्लो लर्नर चिल्ड्रन' ला त्यांच्या अथक कार्याबद्दल सन्मानित केलं जाणार आहे. त्याचबरोबर स्क्रिप्टिस क्रिएशन आणि रंगाई प्रॉडक्शन यांच्या 'असेन मी नसेन मी' या नाटकाला वर्षातील सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून पुरस्कार देण्यात येणार आहे.

पुरस्कारांची घोषणा करताना पं. हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, "दरवर्षी, आम्ही अशा व्यक्तींचा सन्मान करतो ज्यांनी गुरु दीनानाथजींच्या समर्पण, उत्कृष्टता आणि सेवेच्या भावनेला मूर्त रूप दिलं आहे. हा उत्सव केवळ भूतकाळाला श्रद्धांजली नाही तर वर्तमान आणि भविष्याला दिलेली एक मशाल आहे."

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संकल्पनेनुसार "सारं काही अभिजात" या आत्म्याला भिडणाऱ्या संगीतमय श्रद्धांजलीनं पुरस्कार सोहोळ्याचा समारोप होईल. यावेळी विभावरी आपटे-जोशी, मधुरा दातार यांच्यासह अनेक कलाकार आपली कला सादर करणार आहेत. त्याचबरोबर विद्यावाचस्पती शंकरराव अभ्यंकर यांच्या अनोख्या व्याख्यानाचंही यावेळी आयोजन करण्यात आलं आहे.


 Give Feedback



 जाहिराती