सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 विश्लेषण

‘चितळे बंधू मिठाईवाले’ नावाचा गैरवापर! पुण्यात बनावट बाकरवडीची विक्री,करुन केली फसवणूक

डिजिटल पुणे    17-04-2025 14:03:17

पुणे : राज्यात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणेकरांच्या पसंतीची प्रसिद्ध चितळे बंधू मिठाईवाले यांच्या नावाचा गैरवापर करून बाकरवडीचे उत्पादन करून ती ऑनलाईन आणि ऑफलाईनरित्या विक्री करून फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फसवणूकीच्या आरोपावरून सदाशिव पेठेतील प्रसिद्ध चितळे स्वीट होमच्या मालकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुण्यातील प्रसिद्ध बाकरवडीच्या उत्पादनावरून वाद-विवाद झाल्यानंतर दाखल झालेला हा पहिला गुन्हा आहे. यामुळे पुणेकरांमध्ये प्रचंड खळबळ देखील उडाली आहे.

याप्रकरणी पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात चितळे स्वीट होमचे प्रो.पा. प्रमोद प्रभाकर चितळे यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (२), ३५० व आयटी अॅक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत नितीन दळवी (वय ३५, रा. धनकवडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केल्यानंतर गुन्हा नोंदवला आहे.

असा प्रकार उघडकीस…

चितळे बंधू मिठाईवाले यांच्याकडे ठरलेल्या काही ग्राहकांकडून बाकरवडीची चव बदलली असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यामुळे तक्रारदारांनी बाजारातील काही पाकिटे विकत घेऊन त्याची पाहणी केली. तेव्हा चितळे बंधू मिठाईवाले यांच्याकडून तयार होणाऱ्या पाकिटात व या पाकिटात तफावत आढळून आली. त्याची चव, पाकिट व तयार होणाऱ्या सर्व गोष्टींची प्रमुख कारखान्यात तपासणी केली. त्यासोबतच या पाकिटावर मराठीत ‘चितळे स्वीट होम’ तसेच पुणेरी स्पेशल बाकरवडी असे देखील असल्याचे दिसून आले. तेव्हा तक्रारदारांना त्यांच्या नावाने बाकरवडी विक्री केली जात असल्याचे लक्षात आले. यानंतर याप्रकरणी तक्रार देण्यात आली होती.

वर्षभरापासून विक्री

चितळे बंधू मिठाईवाले यांची बाकरवडी असल्याचे भासवून गेल्या एक वर्षांपासून बाजारात ऑफलाईन व ऑनलाईन विक्री केली जात असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. आता पुणे पोलिसांकडून याचा तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, या गुन्ह्यांमुळे पुणेकरांमध्ये देखील प्रचंड खळबळ उडाली असून, अधिकृत बाकरवडीच घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती