पुणे : पिंपरी चिंचवड शहरात आज महानगरपालिका आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमानं क्रांतिवीर चापेकर स्मारक लोकार्पण आणि राष्ट्रीय संग्रहालय कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृह इथं पार पडला. यावेळी सदर क्रांतिवीर चापेकर बंधू स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यात अध्यक्ष स्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थितीत होते. पिंपरी चिंचवड शहरातून नागरिकांनी मोठ्या संख्येनं हजर राहून लोकार्पण सोहळ्याचा आनंद घेतला आहे. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंदी भाषा सक्तीबाबत भाष्य केलं. ज्यांना काही उद्योग शिल्लक नाही, ते हिंदी भाषेला विरोध करतात, असा हल्लाबोल त्यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता केला.
यावेळी अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, "मराठी ही आपली मातृभाषा आहे. ज्यांना काही उद्योग शिल्लक नाहीत, ते हिंदी भाषेचा विरोध करत आहेत. हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, तसेच इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. तिन्ही भाषा आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे हिंदीला विरोध करण्याचं काही कारण नाही. मराठी आपली मातृभाषा आहे आणि काही महिन्यापूर्वी केंद्र सरकारनं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे ज्यांच्याकडं काही उद्योग नाही, ते हिंदी भाषेला विरोध करत आहेत, असा टोला देखील अजित पवार यांनी नाव न घेता राज ठाकरे यांना लगावला आहे. तर नाशिक दंगली प्रकरणात आम्ही कुठल्या पार्टीचा कार्यकर्ता म्हणून केस दाखल करत नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करत आहोत. कुणालाही सोडलं जाणार नाही," असा इशारा देखील अजित पवार यांनी दिला आहे.
बीडचा निलंबित पीएसआय अभिजीत कासले याचे आरोप पाहता त्याची सुद्धा कसून चौकशी केली जाईल. त्याच्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. तर बीडमध्ये ज्या महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली, त्यांचे फोटो कालरात्री उशिरा प्राप्त झाले आहेत. जे दोषी असतील, त्यांच्यावर योग्य कारवाई देखील केली जाणार आहे. इथं अशा अमानुष मारहाणीला कधीही समर्थन करणार नाही," अशी तटस्थ भूमिका घेत अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना प्रतिपादन केलं आहे.