नागपूर : नागपूर शहरात एक विचित्र अपघाताची घटना घडली आहे. आईसोबत ऑटोतून खाली उतरत असतांना एका सात वर्षीय मुलाला ट्रकने चिरडल्याची घटना घडली आहे. ही घटना हिंगणा टी पॉईंटवर घडली असून आई आणि बहिणीच्या डोळ्यादेखत या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला आहे.
नागपूरच्या हिंगणा टी पॉईंटवर एक भीषण अपघात झाला आहे. एका सात वर्षीय मुलाला ट्रॅकने चिरडल्याची घटना घडली आहे. आहान नायक असे या सात वर्षीय मुलाचे नाव आहे. शिकवणी वर्ग आटोपवून आई व बहिणीसोबत घरी परतत असतांना त्याच्यावर काळाने घात केला. आई आणि बहिणीच्या डोळ्यादेखत आहानचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर जखमी अस्वस्थेत असलेल्या आहानला स्थानिकांनी रुग्णालयात भरती केले. मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एमआयडीसी पोलिसांनी ट्र्क चालकाला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुलसी सूरज नायक ही महिला त्यांचा मुलगा अहान (वय ७) आणि मुलगी स्नेहा (वय ९) यांच्यासोबत रामदासपेठमधील ट्यूशन क्लासहून ऑटोने घरी परतत होत्या. सायंकाळी साधारण चारच्या सुमारास त्या हिंगणा नाका टी-पॉईंटजवळ देशमुख ट्रेडिंग कंपनीसमोर ऑटोतून उतरल्या. त्या ऑटोचालकाला पैसे देत असतानाच अचानक हिंगण्याकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने (ट्रक क्रमांक एमएच ४०/ सीआर ५१००) अहानला धडक दिली. भरधाव वेगात आलेल्या ट्रकने अहानला धडक देत फरफटत नेलं.
अपघात इतका भीषण होता की अहान ट्रकच्या पुढच्या चाकाखाली आला. ट्रकने अहानला देशमुख ट्रेडिंगपासून शांतनू ट्रेडिंगपर्यंत लांबपर्यंत फरफटत नेलं. अपघातात तुलसी नायक यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली असून, परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदत करत लता मंगेशकर रुग्णालयात अहानला दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे ठाणेदार महेश चौहान, पोलीस निरीक्षक संजय बनसोडे आणि इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी दिलेल्या वाहन क्रमांकाच्या आधारे ट्रक काही अंतरावर जप्त करण्यात आला आणि चालकाला ताब्यात घेण्यात आले.