ज्ञानाचे महत्त्व
विद्या नाही बुद्धी नाही | विवेक नाही साक्षेप नाही | कुशळता नाही व्याप नाही | म्हणौन प्राणी करंटा ||९/४/१०||
या पृथ्वीवर राहणाऱ्या काही लोकांना खूप यश मिळते आणि काही मात्र अभागी राहतात. काही लोक श्रीमंत होतात, राजवैभव भोगतात आणि काही गरीब राहतात. समर्थ सांगत आहेत की हा भेद गुणांचा परिणाम आहे. गुणवान, विवेकवान, कुशल, विद्यावान, श्रमवान अशी माणसे वैभव भोगतात आणि बाकीचे साधारण किंवा त्याहून हीन आयुष्य अनुभवतात.
जो जाणता असतो तो उद्योग, कष्ट करतो. नेणता, आळशी माणसाला कष्टाची सवय नसते. त्यामुळे त्याला नीट पोट भरता येत नाही. विद्याहीन माणूस करंटा असतो तर विद्यावान भाग्यवान बनतो. वडीलधारे आपल्याला नीट शिकला नाहीस तर भीक मागावी लागेल याची जाणीव करून देऊन जाणतेपणाने म्हणजे शहाणपणाने वागण्याचा सल्ला देतात. समजा दोघे भाऊ आहेत. मोठा भाग्यहीन निघाला आणि धाकटा कर्तबगार झाला. तर त्याचे कारण विद्येत आहे. विद्या, हुशारी, विवेक, प्रयत्न कौशल्य, व्याप यापैकी एकही गुण माणसात नसेल तर तो करंटा बनतो. ज्याच्यात हे गुण असतात तो भाग्यवान बनतो.
जशी विद्या तशी महत्त्वाकांक्षा. माणूस जेवढा व्याप करतो तेवढा वैभवशाली होतो. सामर्थ्याप्रमाणे कर्तबगारी दाखवतो. ज्याच्यापाशी विद्या नाही तो भाग्यहीन, मलीन, अस्वच्छ दिसतो. पशुपक्षी गुणवान असतील तरी माणूस त्यांना जवळ करतो. म्हणजेच अंगी गुण नसतील तर आयुष्य वाया गेल्यासारखे होते. प्रपंच काय किंवा परमार्थ काय जो जाणता आहे तोच प्रभाव दाखवतो, मान मिळवतो. अज्ञान सर्व दु:खाचे खरे कारण आहे. अज्ञानामुळे प्राणी भ्रमात पडतो, फसतो आपली वस्तू विसरतो. अज्ञानामुळे शत्रू जिंकतो, नुकसान, यातना सोसाव्या लागतात. भरीला पडून माणूस कसेही वागतो.
माया-ब्रह्म, जीव-शिव, सार-असार, भाव-अभाव, खरा कर्ता कोण ?, बंध-मोक्ष कोणास घडतो ? देव निर्गुण आहे, मी कोण आहे ?, मी आणि देव एकरूपच आहोत हे ज्ञान करून घ्यावे आणि जन्ममरण चुकवावे. ज्ञान व्यवहारात जितके जाणले आणि मिथ्या म्हणून बाजूस सारले तितके दृश्य ओलांडले असे समजावे. मीपणा, अहंकार दृश्य म्हणून गळून पडतो आणि केवळ आत्मस्वरूपाचे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान शिल्लक राहते.
भगवंताला म्हणजेच जाणत्याला न जाणता करोडो साधने केली तरी कोणी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. त्याला आधी जाणावे मग व्यवहारातील प्रसंग ओळखून तसे वागावे. खोट्या कल्पनेच्या पोटी अज्ञानी माणसाला अंधारात काहीतरी दिसले आणि तो घाबरून काही खटाटोप करायला गेला आणि प्राणास मुकला. हा खोट्या कल्पनेचा खेळ आहे. धर्म-अधर्म, योग्य-अयोग्य जाणत्याला कळतो. नेणता चुकीचे कर्म करतो. त्यामुळे त्याला यमयातना भोगाव्या लागतात. ज्ञानाचा मार्गच उत्तम मार्ग आहे त्याची हेळसांड करू नये. मुर्खाला अर्थात हे पटत नाही. अलिप्त कसे राहावे हे ज्ञान झाल्यावरच कळते. ज्ञान हे स्मरणरूप आहे तर अज्ञान विस्मरणरूप आहे. मी आत्माच आहे हे स्मरण अखंड राहणे हे ज्ञानाचे लक्षण आहे. मी देह आहे, दृश्य आहे याचे अखंड स्मरण हे अज्ञानाचे लक्षण आहे. मी देव आहे या ज्ञानाने अज्ञान नाहीसे होऊन शेवटी ते ज्ञानही परब्रह्मात लयाला जाते.
कथाव्यास/प्रवचनकार/लेखक : श्री. दामोदर रामदासी पुणे. (रामदासी मठ परंपरा, नवगणराजुरी, जिल्हा बीड)