सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
 जिल्हा

जनतेच्या अर्जांवरील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

डिजिटल पुणे    21-04-2025 15:51:18

नागपूर : विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज व निवेदनांवर सकारात्मक कार्यवाही होवून या अर्जाची सद्यस्थिती अर्जदाराला एसएमएसद्वारे कळण्यासाठी पब्लिक ग्रिव्हेन्सेस रिडर्रसल सिस्टिम (पीजीआरएस) ही ऑनलाईन प्रणाली लवकरच कार्यान्वित होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुख्यमंत्री सचिवालयात या संदर्भात बैठक झाली.

शासकीय कामकाजामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून जनतेला तात्काळ दिलासा देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. यास अनुसरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दौऱ्यावेळी व येथील मुख्यमंत्री सचिवालयात विविध विभागांशी व विषयांशी संबंधित निवेदने, अर्ज व तक्रारी संबंधित विभागाकडे पाठवून त्यावर उचित कार्यवाही होण्याच्या दृष्टीने पीजीआरएस ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सचिवालयाच्या विशेष कार्यधिकारी आशा पठाण यांनी या ऑनलाईन प्रणाली विषयी सविस्तर सादरीकरण केले.

या ऑनलाईन प्रणालीद्वारे प्राप्त निवेदने व अर्जांचे विभागनिहाय व तक्रारनिहाय वर्गीकरण करण्यात येईल. हे अर्ज व निवेदने स्कॅन करून संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात येईल व त्याची माहिती एसएमएसद्वारे अर्जदाराला कळेल. संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात येवून अर्जदाराचा अर्ज निकाली काढल्याबाबत अर्जदारास एसएमएसद्वारे माहिती मिळेल. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या ऑनलाईन प्रणालीबाबत समाधान व्यक्त केले. लवकरच ही सुविधा जनेतेचा सेवेत रूजू होणार आहे.

बैठकीस विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिना, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, भूमि अभिलेख, समाज कल्याण आदी विभागांचे प्रमुख उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती